मनाच्या आत दडलेलं काही...

'नमस्कार रोहनजी, दोन मिनिटं वेळ आहे का? बोलू शकतो का?'

मोबाईल फोनवरचा नंबर 'लोकसत्ता'च्या महापे डेस्कपैकी एक होता. त्यामुळे फोन कामाचा असणार, हे तो उचलण्याआधीच ओळखलं होतं. रिपोर्टिंगला असल्याने डेस्कवरून येणाऱ्या फोनचा साधारण सूर हा, 'अरे, तो कोट कधी येणार आहे' किंवा 'बातमीत या या गोष्टी मिसिंग आहेत, त्यामुळे बातमी लावता येणार नाही' असा असतो ही सवय. त्यापुढे मी दिलेली बातमी कशी बरोबर आहे आणि ती कशी आजच तेसुद्धा पहिल्या पानावरच लागली पाहिजे, हे पटवून देण्याची माझी धडपड. हे सगळं अगदी ठरलेलं.

पण त्या दिवशी संध्याकाळी आलेल्या त्या फोनवरचा आवाज ऐकून मी खरं तर ऑफिसमधल्या खुर्चीतल्या खुर्चीत भेलकांडलो होतो. आता नरिमन पॉइंटच्या त्या ऑफिसमधल्या खुर्च्या तकलादू होत्या आणि त्या खुर्च्यांवर जरा रेलून बसलं की, भेलकांडून जायला व्हायचं, हे खरंच. पण तरीही एखाद्या वर्तमानपत्राच्या कार्यालयातल्या डेस्कवरचा माणूस एखाद्या रिपोर्टरशी एवढ्या मृदू आवाजात बोलतोय, ही कल्पना या धंद्याच्या वाऱ्याला उभं राहिलेल्यालाही काहीशी असह्य होईल, अशीच आहे.

'नमस्कार रोहनजी, दोन मिनिटं वेळ आहे का? बोलू शकतो का? मी स्वरूप पंडित बोलतोय. तुमची बातमी वाचली. उत्तमच लिहिली आहेत. याआधीही तुमचे लेख आणि बातम्या वाचतच आलोय. खूप आवडतात. आज निमित्त झालं आणि तुमच्याशी संपर्क साधला.'

साधारण चार-पाच वर्षांपूर्वी फोनवर झालेली ती स्वरूपची आणि माझी पहिली भेट. तलत महमूद किंवा अरुण दाते यांच्या पठडीतलाच मुलायम आवाज, अत्यंत मृदू आणि शांत बोलणं आणि बोलण्यातूनच समोरच्याला जिंकून घेणारं माधुर्य! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर आताच्या जमान्यात एवढा मृदूभाषी इसम माझ्या तरी बघण्यात आला नव्हता. सुरुवातीला वाटलं की, डेस्कवरचं कोणीतरी थट्टामस्करी करतंय. पण आवाजातली कळकळ खरी आहे, हे फोनवरूनही जाणवत होतं.

अशा वेळी समोरच्या माणसाशी कसं बोलावं, हे खरंच मला कळत नाही. म्हणजे तुमचं कौतुक केल्यानंतर अगदी औपचारिपणे थँक्स म्हटल्यावर आपण आपलेच स्वत:ला आखडू वाटू लागतो. त्यातून एका सहकाऱ्याने एवढ्या मनमोकळेपणे दुसऱ्या सहकाऱ्याची स्तुती करण्याचा प्रघात सहसा नाही. त्यामुळे आणखीनच गांगरून व्हायला झालं. दोन-चार मिनिटं थातुरमातूर बोलून फोन ठेवला आणि बाजूला बसलेल्या मैत्रिणीला स्वरूप पंडितबद्दल विचारणा केली.

'अरे, तो सगळ्यांशी असंच बोलतो. नुकताच महाप्यात जॉईन झालाय,' अद्ययावत माहिती मिळाली.

त्यानंतर स्वरूपला भेटण्याचाही योग आला. गोल चेहरा, कपाळावरून बालसेनेची पिछेहाट झालेली, चेहऱ्यावर सदैव टवटवीत हसणं, स्वच्छ, साफ आणि निर्मळ डोळे, पाच-साडेपाच फुटांच्या आतबाहेरची उंची, अर्ध्या बाह्यांचा शर्ट घालून एका हातात रुमाल घेऊन कपाळावरचा घाम हसत हसत पुसणारा स्वरूप भेटताच क्षणी आवडला. आपलासा वाटला. 

पहिल्या भेटीतच बऱ्याच गप्पा झाल्या. गप्पांवरून हा माणूस आपल्याच पंथातला आहे, हे जाणवलं. युपीएससीची तयारी करत असल्याने वाचन चांगलं आणि चौफेर. साहित्य, संगीत, कलेची आवड असलेला. मला वाटतं, एखादं वाद्यही तो शिकत होता. थोडक्यात कुंडलीतले बरेचसे गूण अगदी बरोबर जुळणारे. पण या सगळ्याच्या जोडीला त्याचं ते मृदू बोलणं अगदी सखाराम गटणेच्या प्राज्ञ मराठीची आठवण करून देणारं होतं. 

नंतर नंतर लक्षात आलं की, ते बोलणं काही कृत्रिम नव्हतं. ते त्याच्या स्वभावाचा भागच होतं. स्वरूपशी अधेमधे भेटीगाठी होत होत्या. पण कामाच्या झपाट्यात मोकळेपणाने गप्पा मारण्याचे योग खूपच कमी आले. त्यानंतर तो भेटला ते 'बदलता महाराष्ट्र' या लोकसत्ताच्याच एका कार्यक्रमात. त्या दिवशी त्याच्या बरोबर त्याची बायकोही होती. तीसुद्धा अगदी त्याला साजेशीच. मित पण मृदुभाषी, शालीन आणि अत्यंत शांत. 

पुढे स्वरूप त्याच्या कामातून भेटत गेला. कधी त्याचे लेख वाचले, तरी आवर्जून सांगणं व्हायचं नाही. पुढे कधी भेट झाली की, मग विषय निघायचा. स्तुती केली की, मोकळेपणाने हसून 'धन्यवाद रोहनजी' म्हणायचा. ही प्रत्येक नावापुढे 'जी' म्हणायची सवय त्याला कुठून लागली, तोच जाणे. त्यानंतर स्वरूपने लोकसत्ता वर्षवेध हे वार्षिक काढायची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. एक वर्ष नाही, तर माझ्या आठवणीत तीन वर्षं. त्यापैकी एक वर्षं तर तो लोकसत्तेच्या सेवेतही नव्हता. पण खास वर्षवेधसाठी त्याने काम केलं होतं. एका अर्थी ते त्याचंच अपत्य होतं.

स्वरूप कामात किती वाघ होता, याची पावती म्हणजे ते वर्षवेधचे अंक! अत्यंत नियोजनबद्धरित्या काढलेल्या त्या अंकांमधून स्वरूपची कामाबद्दलची निष्ठा, प्रेम आणि बांधिलकी सहज दिसते. पुढे त्याने लोकसत्ता सोडलं. नरिमन पॉइंटलाच असलेल्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये तो रूजू झाला. 

त्यानंतर एक-दोन वेळा नीलेश बने या आमच्या दोस्ताबरोबर चहा प्यायला आला असताना तो भेटला. तेव्हाही त्याची मूर्ती तशीच होती. चेहऱ्यावरचं हसणं तसंच निरागस आणि निखळ होतं. दर वेळी भेटल्यानंतर वाटायचं की, या माणसाला आपण जास्त ओळखलं पाहिजे, त्याचा सहवास वाढवला पाहिजे. त्याच्याकडून ऐकलं पाहिजे, त्याला आपलं सांगितलं पाहिजे. पण तशी वेळ कधीच आली नाही.

पुढे मी कामानिमित्त दिल्लीला आलो. आता तर भेट होण्याची शक्यता खूपच धुसर होती. दोन महिन्यांपूर्वी कळलं की स्वरूपला कँसर झालाय. त्या आजाराचं गांभीर्य माहीत असल्यामुळेच स्वरूपची काळजी वाटायला लागली. एकदा वाटलं होतं की, मुंबईला फेरी झाल्यावर त्याला भेटायला जावं. पण कँसर माणसाचं काय करतो, हे खूप जवळून बघितलं असल्याने धीर झाला नाही. नंतर काही दिवसांनी तो रिकव्हर होत असल्याची बातमी मिळाली. कुठेतरी आशा पल्लवित झाली. आमचा महाराष्ट्र टाईम्समधला आशीष पाठक कँसरशी दोन हात करून मृत्युच्या दारातून परत अाला होता. स्वरूपही असाच परत येईल, असं वाटत होतं.

दोन आठवड्यांपूर्वी मुंबईला होतो. घरी काहीतरी काम करत होतो. शनिवार संध्याकाळची वेळ होती आणि परागचा फोन आला. स्वरूप पंडित गेला! खरं तर म्हणजे काय झालं, हे मला कळेपर्यंत पाच मिनिटं गेली होती. साधापण माझ्याच वयाचा, कदाचित एखाद वर्षाने लहानच असेल, मुलगा गेला. तो आजारी असताना त्याला मदत करायला किती अदृश्य हात पुढे सरसावले, हे बोलणंसुद्धा नंतर झालं. पण त्या वेळी काहीच सुचत नव्हतं.

खरं तर त्या क्षणी आणि त्या पुढले काही क्षण अस्वस्थ झालो होतो. पण नंतर जगण्याचा वेग इतका प्रचंड होता की, कामाला लागलो. वाटलं होतं, तशी कुठे फार वेळा भेट झाली होती, एवढा परिचय नव्हता, एवढी घसिट नव्हती, तारादेखील पूर्णपणे जुळल्या नव्हत्या, तानपुरा लागला नव्हता, मैफल सजली नव्हती. पण तरीही स्वरूप पंडितचं जाणं चटका लावून गेलं. नाही, कुठेतरी त्या न जुळलेल्या तारा छेडून गेलं. अनेक विसंवादी सूर मनात घुमायला लागले.

अत्यंत निर्व्यसनी, कदाचित अजातशत्रू, जगन्मित्र, मित आणि मृदुभाषी, साधा, सरळ स्वरूप गेला. अगदी कळकळीने मनापासून दोस्तांचीच नाही, तर चांगल्याची तारीफ करणारा स्वरूप गेला. सावरकरांच्या 'जे जे उत्तम उदात्त उन्नत, महन्मधुर ते ते' या ओळी जगणारा स्वरूप गेला. त्याच्या पत्नीला किंवा आईवडिलांना फोन करायचंही धैर्य होत नाही. 

स्वरूप गेला. शरीराला होणाऱ्या असह्य यातना संपवून तो गेला. तसं अगदी ३२ वर्षांच्याच आयुष्यात जवळच्या अनेक व्यक्तींचे मृत्यू अगदी जवळून बघितले आहेत. काही समवयस्कांचेसुद्धा. पण स्वरूपचं जाणं एक ओरखडा ओढून गेलं. आशीष पाठक आजारी होता, तेव्हाही मन असंच विषण्णं झालं होतं. कदाचित एकाच धंद्यातले असल्याने त्यांच्याशी जास्त कनेक्ट करू शकत असेन. पण स्वरूपची ही अशी अकाली एक्झिट कालवाकालव करून गेली. 

स्वरूपचा मोबाइल नंबर अजूनही सेव्ह आहे. तो डीलिट करण्याचं धैर्य होत नाही. फेसबुक फ्रेंड्समध्येही तो आहे. त्याचा प्रोफाईल मुद्दाम जाऊन बघितला नाही, तरी त्याला अनफ्रेंड करणं शक्य नाही. कदाचित त्याच्याशी जोडलेलं राहण्याचा हा माझा प्रयत्न... एखाद्याचं जाणं चटका लावणारं असतं, हे वाक्य बातम्यांमध्ये किंवा मृत्युलेखांमध्ये अनेकदा वाचलं होतं. तसाच चटका गेले काही दिवस अनुभवतोय. मनात आणि कानात मात्र स्वरूपशी झालेल्या पहिल्यावहिल्या संभाषणातलं पहिलंवहिलं वाक्यच गुंजतंय, 'नमस्कार रोहनजी, दोन मिनिटं वेळ आहे का? बोलू शकतो का?'

Comments

Popular Posts