बाबा नावाचा मोठा माणूस



कधीकधी एखाद्या जुन्या हिंदी गाण्यातली बारकाव्याची जागा अचानक दिसते, 'आजा सनम, मधुर चांदनी में हम' गाण्याच्या आधीचे सूर ऐकू येतात, संध्याकाळच्या वेळी अचानक रामरक्षा पुटपुटावीशी वाटते, उगाच कारण नसताना नमस्कार केल्यासारखा हात डोक्यावरून फिरतो, 'असा मी असामी'मधलं एखादं स्वगत आठवतं, आणि मग मला बाबांची खूप आठवण येते. आपण पोरके झालो, ही भावना व्यापून टाकते...

रोहन टिल्लू

काही माणसांचं जगात असणं आपण खूप गृहित धरलेलं असतं. त्यांच्याशिवाय जगाची कल्पना करवत नाही. खासकरून आपल्या जवळच्या माणसांबद्दल हे हमखास जाणवतं. आई-वडील यांचं स्थान त्यात खूप वरचं. आईला जाऊन १४-१५ वर्षं उलटून गेली. शेवटचं एक वर्षं ती अंथरूणाला खिळली होती. दुर्दैवाने तिच्यासोबतच्या आनंदी क्षणांपेक्षा त्या शेवटच्या वर्षातले तिचे हालच आठवतात आणि अंगावर अजूनही काटा येतो. ती जिवंतपणी मरणयातना सोसत असताना अगदी मनोभावे शेवटचेच देवासमोर जोडलेले हात आणि 'तिला या यातनांतून सोडव' असं जगावेगळं मागणं मागताना माझा मीच मला दिसतो. आईचं जाणं हे कणाकणाने अनुभवत होतो. तो दिवस कधी ना कधी येणार, हे लख्खं दिसत होतं.

पण बाबांचं तसं नव्हतं. एका आठवड्याचं Hospitalization आणि आठवड्याभरात सगळं संपलं होतं. एका गुरुवारी अगदी व्यवस्थित असलेला माणूस पुढल्या गुरुवारी शववाहिनीतून घरी आला होता. ते जाणं मनात कुठेतरी खोलवर रुतलं. एवढं की, त्या वेळी ते जाणवलं नाही. पण अजूनही अधेमधे खपली निघते आणि ती जखम भळाभळा वाहू लागते. 

आजचा दिवस हा असाच खपली निघायचा होता. दुपारच्या वेळी सहज 'केकावली' मधील 

अगा ! प्रणतवत्सला !' म्हणति त्या जनां पावलां;

म्हणोन तुमच्याच मी स्मरतसे सदा पावला ।

करू बरि कृपा, हरू व्यसन, दीन हा तापला.'

असे मनि धरा; खरा भरवसा मला आपला


या ओळी आठवल्या आणि बाबांची आठवण झाली. आपल्या जवळच्या माणसांना आपण आपल्या आठवणीत पहिल्यांदा कधी अनुभवतो, हे आपल्या लक्षातच राहत नाही. आईबाबांच्या बाबतीत तसंच! आपल्या जन्मापासूनच त्यांनी आपल्याला अंगाखांद्यावर खेळवलेलं असतं. त्यांचे श्वास-नि:श्वास आपल्याला तेव्हापासूनच परिचयाचे असतात. पण पहिली आठवण नेमकी कुठली, ते काही सांगता येत नाही. बाबांच्या बाबतीत या आठवणी माझ्यासाठी अगदी तीन ते चार वर्षांचा असल्यापासूनच्या आहेतच आहेत.





आई-बाबांचं लग्न झालं, तेव्हा बाबा ३५ वर्षांचे होते आणि माझा जन्म झाला तेव्हा ३६! म्हणजे त्या काळाच्या हिशोबात मध्यमवयीन! पण त्यांचा उत्साह, त्यांचा रुबाब, दिसणं आणि निटनेटकेपणा त्यांच्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान असलेल्यांनाही लाजवेल असाच होता. प्रणवचा, म्हणजे माझ्या भावाचा जन्म त्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे बाबा ४२ वर्षांचे असताना झाला. पण अजूनही माझ्या आठवणीत बाबा माझ्यासोबत आणि प्रणवसोबत अंगणात क्रिकेट खेळताना आहेत. मी तर त्यांना त्यांच्या गल्लीतल्या मित्रांसोबत गल्लीत ओव्हरआर्म आणि अंडरआर्म क्रिकेट खेळतानाही बघितलं होतं.

आपले बाबा हँडसम आहेत, हे लहानपणापासून मनावर ठसलं होतं. आई तरुणपणी खूपच सुंदर दिसायची. तिचे फोटो याची साक्ष देतात. ती सावळी होती आणि बाबा गोरेपान-घाऱ्या डोळ्यांचे! त्यांच्या मित्रांमध्ये त्यांचं टोपण नावही 'घाऱ्या' असंच होतं. राज कपूरचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्याच्यासारखी हॅटही त्यांनी विकत घेतली होती. रेडिओवर राज कपूरची गाणी लागली की, बाबा अगदी त्याच्यासारखा अभिनय करत ती गाणी म्हणायचे.

बाबांना सुरांची देणगी होती. गळ्यात सूर होते आणि बोटांमध्येही होते. त्यांनी केलेल्या असंख्य उपद्-व्यापांपैकी एक म्हणजे व्हायोलिन शिकायला प्रभाकर पंडित यांच्याकडे जाणं! बाबांच्या भाषेतच सांगायचं, तर व्हायोलिन वाजवणं कमी आणि संगीतविषयक गप्पाच जास्त व्हायच्या त्यांच्या तिथे! आमच्या घरी एक व्हायोलिन असलेलं मला लख्खं आठवतं. कधीतरी दुपारी बाबांना हुक्की यायची. ते व्हायोलिन काढून बसायचे. एखाद-दोनदा काहीतरी वाजवल्यासारखं केलं की, व्हायोलिनवर पादल्याचा आवाज काढ, ट्रेनच्या भोंग्याचा आवाज काढ अशा लिला सुरू व्हायच्या. मग मी पोट धरून हसायचो. तसा मी हसायला लागलो की, बाबा गालातल्या गालात हसायचे.






लहान असल्यापासून आईपेक्षा बाबांचा पुळका मला जास्त होता. कधीकधी आईबाबांची भांडणं वगैरे झाली आणि आई बाबांना काही जास्त बोलायला लागली की, मला उगीचच बाबांची दया वगैरे यायची. खरं तर आईचं चिडणं अगदी स्वाभाविक असायचं. पण तरी माझ्या नजरेत बाबा हिरो होते. ते राहायचेही तसेच हिरोसारखे. मी तरी त्यांना शेवटपर्यंत कधी गबाळं बघितलं नाही. झोपतानाही मस्त तेल लावून भांग पाडून, निव्हिया क्रीम आणि पावडर वगैरे लावून झोपायचे. आई तर कधीकधी गमतीत म्हणायची पण की, 'यांच्या स्वप्नात बहुतेक हेमा मालिनी येते'! रोज नाही, तरी दर एक-दोन दिवसांआड न चुकता दाढी करायचे. पण दाढी करायच्या आदल्या दिवशी त्यांच्या हनुवटीवरून गाल फिरवून तो खरखरीत स्पर्श मला खूप आवडायचा. लहान असताना त्यांच्या कडेवर हट्टाने बसून मी त्यांना तशी हनुवटी फिरवायला लावायचो.

अशा अनेक गोष्टी मी हट्टाने त्यांच्याकडून करून घेतल्या होत्या. कोणीतरी मला डॉक्टर सेट गिफ्ट म्हणून दिला होता. माझे हक्काचे पेशंट बाबाच असायचे. आमचं जुनं घर मस्त बैठं होतं. पुढे अंगण मागे परस असं औरसचौरस होतं. जेवण झालं की, बाबा अंगणात रामरक्षा म्हणत शतपावली घालायचे. त्यांच्यासोबत मीदेखील चालायचो. रामरक्षेतला एक श्लोक म्हणून ते माझ्याकडून म्हणवून घ्यायचे. ठाण्यातल्या विष्णुनगरच्या गल्लीतलं ते आमचं अंगण, रात्रीचा अंधार, स्वयंपाकघराच्या खिडकीतून झिरपणारा ट्युबलाईटचा प्रकाश आणि त्या प्रकाशात सुरू असलेली आमची शतपावली, हे चित्रं अजूनही माझ्या मनात फिट्टं आहे.


बाबा अगदी प्रणवसोबतही बिनधास्त क्रिकेट खेळायचे



लहानपणीच्या अशा अनेक आठवणी आहेत. गल्लीत बाबांची एक गँग होती. सगळेच बाबांपेक्षा वयाने लहान होते. त्यामुळे कोणाचीच लग्नं झाली नव्हती. जवळपास दर संध्याकाळी गल्लीच्या तोंडाशी असलेल्या चहावाल्यासमोर ही गँग जमायची आणि गप्पा सुरू व्हायच्या. त्यात बाबांची खास शिटी एकदम फेमस होती. फक्त ओठ दुमडून ते ती वाजवायचे. त्या गँगमध्ये कोणालाही मूल नसल्याने मी सगळ्यांचा लाडका होतो. मग बाबांसोबत तिथे गेल्यावर हमखास चॉकलेट मिळायचं, कोणी उचलून घ्यायचं. अजूनही तो नाका, त्या नाक्यावरचे बन्या काका, पक्या आणि काक्या (प्रकाश फडणीस आणि मिलिंद कुलकर्णी) असे अनेक जण अगदी ठळक आठवतात. 

तीच गोष्ट होती गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची! माझ्या आठवणीत आई आणि बाबा काही काळ दोघंही अगदी सक्रीय कार्यकर्ते होते. गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाली की, मिरवणुकीत टीपेचा आवाज बाबांचा असायचा. 'चंद्रभागेला पूर आला, पाणी लागलं वडाला' अशी अनेक गाणी म्हणत ती मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकायची. मिरवणूकीच्या सर्वात पुढे आपल्या दीडक्या (दीड-दीड पावलांचं एक पाऊल टाकत) चालीने प्रसाद म्हणून एक मुलगा होता, तो चालायचा. 

बाबांनी मला दिलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे वाचन, चांगलं संगीत आणि अभिनय यांची अभिरूची! ते स्वत: खूप वाचायचे. मराठी-इंग्रजी अशी अनेक पुस्तकं त्यांनी वाचली आणि मला त्या काळी वाचूनही दाखवली होती. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याशी माझी ओळख झाली ती, पुलंच्याही आधी माझ्या बाबांच्या आवाजात. शनिवार किंवा रविवारची दुपारची वेळ, जेवणानंतर आणखीनच जाणवणारा मधल्या खोलीतला तो अंधार, डोक्यावरून अलगद फिरणारा आईचा हात, एकच खिडकी आणि त्या खिडकीशी बसून पुलंच्या असंख्य व्यक्तिचित्रांपैकी कोणतंही व्यक्तिचित्र आपल्या आवाजाने जिवंत करणारे बाबा... अजूनही एखाद्या दुपारी ते सगळं आठवतं आणि जीव कासावीस होणं म्हणजे काय, याचं प्रत्यंतर येतं.

नाटकाची ओळखही बाबांमुळेच झाली. त्या वेळी बाबा नोकरी सांभाळून 'मित्र-सहयोग' नावाच्या संस्थेत नाटक करायचे. त्यांच्या तालमी आमच्याच शाळेच्या विद्यालंकार हॉलमध्ये वगैरे चालायच्या. कधीकधी बाबा मलाही तालमी बघायला घेऊन जायचे. अशोक साठ्ये, मधू-रजन ताम्हाणे, श्रीहरी जोशी वगैरे ठाण्यातले दिग्गज तिथे असायचे. त्यांची एवढी आठवण नाही. पण नंतर बाबांनी रत्नागिरीजवळच्या चवे गावातल्या लोकांची नाटकं बसवली. त्या रिहर्सल मात्र अगदी ठळक आठवतात. शारदाश्रम शाळेच्या एखाद्या वर्गात त्या तालमी चालायच्या. संध्याकाळी कधीकधी आई मला घेऊन जायची. ती नाटकं हेदेखील एक मोठं प्रकरण असायचं.





चव्यातली ती सगळी मंडळी काहीशी कमी शिकलेली, पण नाटक करण्याची इच्छा एवढी जबरदस्त की, गावच्या उत्सवासाठी दरवर्षी नवीन नाटक बसवायची तयारी होती. त्या नाटकांचं दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन वगैरे सगळं बाबाच बघायचे. ती नाटकंही ठरावीक पठडीतली असायची. म्हणजे त्यात राजकारण असायचं, एक हिरॉईन (उच्चारी हिरवीण) असायची, मग प्रेम असायचं, एखादा खून असायचा आणि शेवट गोड असायचा. हमखास टाळ्याखाऊ नाटकं! ती हिरवीणही मुंबईतलीच एखादी लागायची. संपूर्ण नाटकभर तिची मर्जी सांभाळावी लागायची. गावी तिची खास सोय असायची. बाबांचा मानही गावात मोठा असायचा. एक तर ही नाटकं बसवायला बाबांनी कधी एक नया पैसाही घेतला नव्हता. त्याचंच अप्रुप त्या मंडळींना मोठं होतं. त्यामुळे संपूर्ण चव्यात बाबा डायरेक्टर साहेब म्हणून फेमस होते. माझी रंगमंचावरची पहिली एण्ट्री याच गावात हुकली होती. मी अर्जून बनणार होतो, पण रात्री खूप झोप आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये बसूनच मी झोपून गेलो होतो. 

पण पहिलं नाटुकलं केलं, ते बाबांच्याच मार्गदर्शनाखाली. बाबांनी 'वाऱ्यावरची वरात'मधला 'दारू म्हणजे काय रे भाऊ?' हा पार्ट माझ्याकडून बसवून घेतला होता. त्याचे अनेक हौशी प्रयोग नंतर मी केले होते. तसंच 'रायगडाला जाग येते' मधल्या संभाजी महाराजांचं स्वगत बाबांनीच मी पाचवीत असताना एका स्पर्धेसाठी म्हणून तयार करून घेतलं होतं. ते अजूनही जसंच्या तसं लक्षात आहे. 

एका वर्षी गणपतीत बाबांनी गल्लीतल्या मंडळींचं 'पुरुषांचं हळदीकुंकू' नावाचं नाटक बसवलं होतं. त्याच्या तालमी म्हणजे तर पर्वणी होती. मी साधारण चार-पाच वर्षांचा असेन त्या वेळी! कुलकर्ण्यांच्या गच्चीत नाटकाच्या तालमी चालायच्या. रात्रीच्या वेळी होणाऱ्या या तालमींसाठी सगळे अगदी वेळेवर हजर असायचे. मग त्या वेळी कॉलेजला वगैरे असलेल्या दादा लोकांची जाम धमाल चालायची. मला आठवतं, त्या नाटकात शेवटी हळदीकुंकवाला वाण म्हणून सिगरेटची पाकिटं वाटली होती. 

आकाशवाणी आणि बाबा हे तर अद्वैत होतं. ते काही काळ ऑल इंडिया रेडिओ-विविध भारतीत कामाला होते. पण ते स्टेशन माझ्या जन्मानंतरच सुटलं होतं. तरीही आकाशवाणीतला त्यांच्या मित्रमैत्रिणींचा धम्माल ग्रुप कायम होता. ते रेडिओ आर्टिस्टही होते. त्यामुळे अनेकदा रेडिओवर अनेक प्रहसनांमध्ये सहभागी व्हायला ते जायचे. आकाशवाणीच्या 'बाल-दरबार' या कार्यक्रमात मी चौथीत असताना बाबांमुळेच मला सहभागी होता आलं. त्यानंतरही अनेकदा आकाशवाणीत बाबांच्या नावाचा पासपोर्ट घेऊन मी अक्षरश: बागडलो. अगदी नंतर त्यांनी 'एका गुराख्याचे महाकाव्य' या राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्या नाटकात 'अमात्य' ही भूमिका केली. वाचिक अभिनय हे त्यांचं बलस्थान होतं. आंधळ्या माणसालाही नाटक नुसतं ऐकून कळायला हवं, हा त्यांचा आग्रह असायचा. त्यामुळे त्यांच्यासोबत माझ्या एखाद्या नाटकाचे डायलॉग्ज पाठ करताना कस लागायचा. त्यांच्याबरोबर एकत्र स्टेजवर काम करण्याची संधी आयुष्यात एकदा तरी मिळायला हवी होती, ही रुखरूख कायमची लागली आहे.


आकाशवाणीतला बाबांचा धम्माल ग्रुप



बाबांच्या काही हटके सवयी होत्या. जांभई आली की, 'हे भगवान, तारी माया' असं काहीतरी ते म्हणायचे. लहानपण सांताक्रुझमध्ये गेल्याने आणि अनेक गुजराती मित्र असल्याने ते एखाद्या गुजरात्याएवढंच सराईतपणे गुजराती बोलायचे. 'जय आद्या शक्ती' ही देवीची गुजराती आरती त्यांना मुखोद्गत होती. दुसरी सवय म्हणजे त्यांचं छापा-काटा करणं! ऑफिसला जायला घरातून निघाले की, नाक्यावर आल्यावर कॉईन उडवायचं. थोडं पुढे गेल्यानंतर परत कॉईन उडवायचं, असं त्यांचं चालायचं. तसंच रस्त्यात कुठेही मंदीर, मशीद चर्च वगैरे दिसलं की लगेच एका हाताने नमस्कार केल्यासारखं करून हात डोक्यावरून फिरवायचा, ही आणखी एक सवय. अनेक वर्षं ते सातत्याने दर शनिवारी शनिमहात्म्य वाचायचे आणि मारूतीच्या मंदिरातही न चुकता जायचे. 

बाबांचं आयुष्य एकदम वेगळंच होतं. तीन बहिणी आणि हा एकटा थोरला मुलगा, म्हणून लहानपणी लाड झाले होते. आजोबा पश्चिम रेल्वेत होते. रेल्वेच्याच क्वार्टरमध्ये राहायचे. त्यामुळे सांताक्रुझ स्टेशनवरचा सगळा स्टाफ ओळखीचा होता. त्या वेळी मोठ्या टोपलीतून हमालांनी उचलल्याची गोष्टही बाबांनी अनेकदा सांगितली होती. त्यांनी त्यांच्या आठवणीत ट्रामही धावताना बघितली होती. आजोबांच्या रेल्वेतल्या नोकरीमुळे त्या वेळच्या फर्स्ट क्लासमधून फिरण्याचा अनुभव घेतला होता. एक-दीड वर्षं सोलापूरला राहिले होते. इंजिनिअरिंग की पॉलिटेक्निक असं काहीतरी शिकायला! तेवढं सोडून बाकी सगळं शिकले. पण परत येताना आशीष मोरलवाल आणि शेखर काळे या दोघांसारखे आयुष्यभर पुरतील असे मित्र जोडून आले. अभिनय, संगीत वगैरेंमध्ये रमणाऱ्या माणसाला इंजिनिअरिंग रूक्ष वाटणं स्वाभाविक होतं. सोलापूरला ते एका बँडमध्ये मेंडोलिन वाजवायचे, ही आठवण नंतर मला त्यांच्याच वयाच्या माझ्या ताईने सांगितली आणि मी चाट पडलो होतो. तिथे ते मिमिक्री आर्टिस्ट म्हणूनही वावरले होते. मुंबईला आले आणि वयाच्या १६-१७ व्या वर्षापासून कामाला लागले.


सोलापूरमध्ये बाबांनी कमावलेली 'मिळकत'... डावीकडून, शेखर काका, बाबा आणि मोरलवाल काका



बाबांच्या व्यक्तिमत्त्वाला किती पैलू होते, याचा विचार करतानाही मन थक्कं होतं. मित्र जमवणं हा सर्वात मोठा गूण त्यांच्याकडे होते. समोरच्या व्यक्तीतलं चांगलं ते त्यांना दिसायचं. वाईटाकडे ते डोळेझाक करायचे. पण त्याची नोंद मात्र त्यांनी मनात करून ठेवलेली असायची. त्यांचे मित्रांचे ग्रुप एवढे वेगवेगळे होते की, बोलता सोय नाही. गल्लीतल्या मित्रांचा ग्रुप मागे पडला. पण ठाण्यातल्या त्यांच्या गाडीला असलेल्यांचा एक नवा ग्रुप झाला. या ग्रुपमधल्या अनेकांच्या फॅमिलीसोबत आम्ही अनेक पार्ट्या केल्या, अनेक पिकनिक केल्या. निळू (उज्ज्वल देशपांडे), ब्रुस (अरुण सावंत), दाढी (सुनील कोतवाल), ढापण्या (गायकवाड काका), मेश्राम, मुणग्या (मुणगेकर काका) आणि बाबांचा खासम खास विश्वनाथ काका अशी धमाल मंडळी होती. 

त्यातच त्यांचा पत्त्यांचा एक सब-ग्रुप होता. ही मंडळी शनिवारी किंवा रविवारी दुपारी पत्ते खेळायला (आईच्या भाषेत कुटायला) एकत्र जमत. आईला या गोष्टीचा प्रचंड तिटकारा होता. पण बाबांकडे पत्त्यांची आवड खानदानी होती. आजोबा आणि आजी पत्ते खेळायचे. आजोबा तर खास अलिबागला ब्रिज खेळायला जायचे. माझ्या दोन आत्या पत्ते खेळण्यात पटाईत होत्या. बाबा तर अगदी मुरलेल्या खेळाडूसारखे खेळायचे. शनिवारी दुपारी सुरू झालेला या लोकांचा पत्त्याचा डाव रात्री उशिरापर्यंत, कधीकधी पहाटेपर्यंत चालायचा. सोबतीला सिगारेट, थंड बिअर आणि बाकी खाणं असायचंच.


मग्न तळ्याकाठी... मित्रांसोबत बाबा



मैफिलींचा बादशाह



या सगळ्या सवयींच्या जोडीला बाबांच्या स्वभावाची दुसरी बाजूही दुर्लक्षित करून चालणार नाही. ती म्हणजे त्यांचा नीटनेटकेपणा आणि वेळेच्या बाबतीत अत्यंत चोख असणं! रात्री नाटकाच्या तालमीवरून किंवा पार्टीवरून कितीही उशिरा आले, आदल्या रात्री कितीही दारू प्यायली असली, तरी पहाटे पाचनंतर बाबा कधीच बिछान्यात दिसणार नाहीत. नंतर नंतर तर पहाटे उठून चालायला जायचे. घरी आल्यावर त्यांचा खास उकळून उकळून काळा झालेला चहा घ्यायचे. आंघोळ करून मग देवपूजा सुरू व्हायची. पूर्वी बाबा दीड-दीड तास देवपूजा करायचे. ही पूजा अगदी साग्रसंगीत होती. सर्वात आधी देवांच्या तसबीरींवर गंधाने चिकटवलेली फुलं काढायची, मग ती निर्माल्यात टाकायची. सगळ्या तसबिरी, मूर्ती गरम पाण्याने धुवायच्या किंवा पुसायच्या. मग त्या एक एक करून पुन्हा मांडायच्या. जुन्या घरी होतो, तेव्हा परडी घेऊन कंबरेला फक्त टॉवेल गुंडाळून आरती-स्तोत्र म्हणत संपूर्ण घराला प्रदक्षिणा मारत तगर, चाफा, जास्वंद, प्राजक्त वगैरे फुलं खुडायची. घरी येऊन स्वच्छ केलेल्या तसबिरी व मूर्तींवर असंख्य टिळे लावून ती फुलं डकवायची हे काम अगदी सुशेगात चालायचं. 

तीच गोष्ट संध्याकाळच्या दिवेलागणीच्या वेळी! इतर दिवशी दिवा लावून शुभंकरोति वगैरे म्हणून भागायचं. पण दर गुरुवारी गोरस गृह आणि त्यानंतर हनुमान डेअरीतून पेढ्याची एक पुडी घेऊन यायचे. त्या पुडीत बरोबर पाच पेढे असायचे. मग दत्ताची आरती व्हायची. पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जायचा आणि मग तीर्थ-प्रसाद यांचं वाटप व्हायचं. अमावस्येला न चुकता नारळ फोडायचे. 

गणपतीच्या वेळी तर आत्याच्या घरच्या एक-दोन आरत्यांना प्रमोद अगदी must असायचा. या आरत्यांची रंगत काही औरच होती. मेन खेळाडू आमचे बाबा! एक तर त्यांना असंख्य आरत्या पाठ होत्या. सुखकर्ता पासून सुरू झालेल्या आरत्यांची मैफिल 'त्रिगुणात्मक त्रैमूर्ती', 'युगे अठ्ठावीस' वगैरे वळसे घालत मध्येच गुजरातीत 'जय आद्या शक्ती' वगैरेपर्यंत जायची. आता या आरतीत पंधरवड्यापर्यंतचा महिमा गायला असल्याने तो बडा ख्यालच असायचा. मग यायची 'येई ओ विठ्ठले' आणि 'आरती सप्रेम' ही जोडगोळी! यातही प्रत्येक ओळ दोनदोनदा घोळवत माथेरानच्या घाटातून जाणाऱ्या मिनी ट्रेनच्या गतीने आरतीचा प्रवास चालायचा. नंतर आरती ज्ञानराजा, आरती तुकारामा वगैरेंसोबत 'आरती दत्तात्रय गुरूची' वगैरेंचा नंबर यायचा. मंत्रपुष्पांजलीतही 'आविक्षी तस्य कामप्रेssss, विश्वेssss' वगैरेंना मोठे आलाप घेतले जायचे आणि मगच आरती संपायची. 

आई गेल्यानंतर ते एकटे पडले. माझ्या एका काकाने त्यानंतर एक दिवस बाजूला घेऊन मला म्हटलं, 'प्रमोदला मी ओळखतो. तो कदाचित दुसऱ्या बाईसोबत लग्न वगैरे करेल.' त्याही वेळी माझी प्रतिक्रिया होती, 'त्यांना खरंच लग्न करायचं असेल, तर त्यांच्या त्या इच्छेआड मी किंवा प्रणव दोघंही येणार नाही. त्यांना या वयात साहचर्याची गरज भासली, तर त्यात चूक काहीच नाही.' ही खरं तर त्यांचीच शिकवण होती. त्यांनी कधीच मला किंवा प्रणवला तुम्ही अमुक अमुक करू नका, असं सांगितलं नाही. प्रणव अभ्यासात थोडा कमकुवत होता. पण त्याचंही त्यांनी कधी अवडंबर केलं नाही. त्याला क्रिकेटमध्ये गती होती, त्याने तिथेच फोकस करावं, हे तेव्हाही त्यांचं मत होतं. कदाचित आपणही अभ्यासात फार दिवे लावले नाहीत, हे कुठेतरी त्यांच्या मनात असावं.





त्यांना फिरायची दांडगी हौस होती. आम्ही लहान असल्यापासून त्यांनी त्यांच्या मित्रांच्या कुटुंबांसह एकत्र खूप सहली केल्या. त्यामुळे लहान वयातच काश्मीर, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, दार्जिलिंग, बंगाल, शिमला-कुलु मनाली, दिल्ली, पंजाब, अशी अनेक राज्य बघून झाली होती. आई गेल्यानंतर तर ते बँकॉक-सिंगापूर-मलेशिया इथेही जाऊन आले. तिथे जाऊन तिथल्या मराठी लोकांसाठी फुकट 'असा मी असामी'चा एकपात्री प्रयोगही रंगवला. पुढे प्रणव लंडनला असताना त्याच्याकडे महिनाभर राहून आले. प्रणवनेही त्यांना खूप फिरवलं. 


लंडनमध्ये प्रणव आणि बाबा



बाबा वयाने मोठे झाले, तरी त्यांच्या मनावर कधी बुरशी चढली नाही. जेवढ्या सहजतेने ते त्यांच्या मित्रांमध्ये मिसळत होते, तेवढ्याच सहजतेने प्रणवच्या, माझ्या किंवा माझ्या आतेबहिणीच्या मित्र-मैत्रिणींसोबतही वावरायचे. अदितीसोबतही त्यांची मस्त मैत्री जमली होती. पण म्हणून कधी त्यांनी त्यांच्या वयाचा बडेजाव मिरवला नाही किंवा उगाच नाक खुपसण्याचे प्रकारही केले नाहीत. आपला आब राखत ते वावरले. वयात जवळपास ४०-४२ वर्षांचं अंतर असूनही प्रणव आणि त्यांचं नातं अगदी खास होतं. 





त्यांना हृदयाचं दुखणं होतं, ही बाब त्यांनी ना मला सांगितली ना प्रणवला! शैलू आत्या त्यांच्या समोर अचानक गेल्याचा धक्का त्यांना बसला होता, हे नक्की! डॉक्टरांनी Valve Replacement करायला सांगितलंय, हेच त्यांनी कळू दिलं नव्हतं, किंवा कदाचित त्यांनाही कळलं नव्हतं. कारण आपल्या तब्बेतीकडे ते अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यायचे. त्यामुळे एवढी मोठी हयगय त्यांच्याकडून होणं शक्य नव्हतं. शेवटी हा व्हॉल्व्ह न बदलल्यानेच त्यांना हृदयविकार जाणवत होता. ते अॅडमिट झाले, त्याच दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. सुदैवाने ती रात्र त्यांनी निभावली आणि दुसऱ्या दिवशी अगदी व्यवस्थित झाले. सर्जरी करायची की नाही, असा प्रश्न होता. तेव्हाही मी त्यांना म्हटलं होतं, 'बाबा, सर्जरी केली, तर अनेक पथ्यं पाळावी लागतील. तुमची आतापर्यंतची Lifestyle पूर्ण बदलावी लागेल. दारू-पार्ट्या बंद कराव्या लागतील. तुम्ही म्हणत असाल की, मी आतापर्यंत जगलोय, तसंच मला जगायचंय. जेवढे काही दिवस आहेत, ते मला माझ्या पद्धतीने जगायचंय, तर आपण तसं करू या! आमच्या उभ्या आयुष्यात तुम्ही आम्हाला 'हे करू नकोस, ते करू नकोस' असं सांगितलं नाहीत. त्यामुळे आता तुमच्या म्हातारपणी आम्ही तुम्हाला अमुक करू नका, तमुक करू नका असं सांगणार नाही. सर्जरीला तयार असाल, तर ती पथ्यं तुम्हालाच पाळावी लागणार आहेत. आम्हाला वाटतं की, तुम्ही सर्जरी करावी. त्यामुळे तुम्ही बरे व्हाल. पण निर्णय तुमचा आहे.' त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांनी सर्जरीला होकार दिला. वाटलं, 'आता ऑपरेशन होईल आणि आठवडाभरात बाबा पुन्हा घरी येतील.' पण तसं व्हायचं नव्हतं. अक्षरश: अचानक ते गेले. चटका लावून गेले. त्या चटक्याची धग त्या वेळी त्या भरात जाणवली नाही. पण नंतर क्षणोक्षणी त्यांची उणीव जाणवत राहते. 

बाबांसोबत घालवलेले अनेक क्षण आज आठवत होते. कॉलेजमध्ये असताना मी एक छोटासा जॉब करत होतो. घरी न सांगता त्या कमाईतून मेंडोलिन शिकत होतो. आधी जर्मन शिकायचं म्हणून आईवडिलांचे बरेच पैसे बुडवले होते. पण नंतर ही कमाई थांबली आणि मेंडोलनीच्या क्लासच्या फीचा प्रश्न निर्माण झाला. आईबाबांनी हात वर केले. मी म्हटलं, 'हा महिना जातो, पुढल्या महिन्यापासून बंद करतो' असं म्हणून मेंडोलिन घेऊन घरातून निघालो. थोडं अंतर गेलो, तोच सनीवरून बाबा आले. मला मागे बसवलं. क्लासपर्यंत सोडलं आणि हातात फीचे पैसे दिले. 'आमच्या वडिलांनी मला हवं ते हवं त्या वयात करू दिलं नाही. पुढे जाऊन माझ्याबाबतीत तू असं म्हणायला नको', असं म्हणून त्यांनी गाडी वळवली. मी हातातल्या पैश्यांकडे आणि बाबांकडे बघतच राहिलो.





आजही मला बाबांचा तो चेहरा आणि ते वाक्य आठवतं. आई-बाबांकडे पैसे उतू चालले होते, असं अजिबात नाही. पण आईचं बिनचूक आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त आणि आईच्या पश्चात बाबांनी सांभाळलेली घरची आघाडी यामुळे त्यांनी कोणत्याही गोष्टीची कमतरता आम्हाला भासू दिली नाही. कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी ते बिनधास्त आम्हाला ढकलायचे. पण पडलो, तर सावरायला ते खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वास होता. आज एखादं नवं आव्हान स्वीकारताना मागे अनेक हात सावरायला असतात. पण त्यात आईबाबांचा भक्कम आधार आता उरला नाही, ही जाणीव होते आणि अगदी पोरकं वाटतं.

बाबांच्या आठवणीत एक व्हीडिओ


Comments

Post a Comment

Popular Posts