आनंदाचा ठेवा!

जर्मन साहित्याची आणि साहित्यिकांची काही संमेलनं वगैरे होतात की नाही, माहीत नाही. साहित्य लोकाभिमुख व्हायला हवं, वाचनसंस्कृतीची वृद्धी वगैरे विषयांवर इथे परिसंवादही होत नाहीत. पण लोक वाचतात. इथलं सरकार लोकांच्या वाचनाची आवड आणखी समृद्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करतं...

    
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो बघितला होता. फोटो भारतातल्या कुठल्या तरी रेल्वे स्टेशनचा होता. आपल्या स्टेशनांवर असते, तशी गडबड त्या फोटोतही दिसत होती. प्लॅटफॉर्मला एक गाडी लागली होती. लोक होते, हमाल होते. फोटो असला, तरी त्यातला कोलाहल नजरेला जाणवत होता. त्या कोलाहलाच्या मध्यभागी एका हातगाडीवर एक परदेशी (गोरा) बाप आणि त्याची लहान मुलगी बसले होते. त्या मुलीच्या हातात पुस्तक होतं आणि बापाच्या हातात Kindle! दोघंही वाचनात मग्न झाले होते.

त्या फोटोसोबत एक मजकूरही होता. वाचन संस्कृती गप्पा मारून नाही, तर अशी कृती करून रुजते वगैरे आशयाचा! तो फोटो बघताना माझ्या डोळ्यासमोर बर्लिनमधली अनेक वाचनालयं आली. मी बर्लिनमध्ये आधी ज्या भागात राहत होतो, त्या Hanzaplatz या Underground स्टेशनमधून वर आलं की, बाजूलाच Hanza Bibliothek म्हणजे लायब्ररी होती. दर वेळी त्या लायब्ररीवरून जाताना कधीतरी एकदा आत जायला हवं, असा विचार डोक्यात यायचा. पण आपल्या इथल्या वाचनालयांमधला अनुभव आठवायचा आणि पावलं बाहेरच थबकायची. 

Hanzaplatz Library मधला माझा सुखाचा कोपरा



आपल्याकडे मेंबरशीप असल्याशिवाय लायब्ररीत गेलं की, जवाहिऱ्यांच्या दुकानात दरोडेखोर शिरल्यानंतर त्यांच्याकडे ज्या नजरेने बघतात, त्या नजरेशी सामना करावा लागतो. त्यामुळे सहज जाऊन पुस्तकं चाळून बाहेर येऊ, वगैरे या शक्यता खूप कमी वाचनालयांमध्ये संभवतात. सन्माननीय अपवाद असलेल्या वाचनालयांनी आपल्याला यातून वगळावं. त्यामुळे या लायब्ररीत जाताना अनेकदा पावलं थबकायची. 

नंतर एकदा युनिव्हर्सिटीतल्या एका मुलीने सांगितलं की, ती मेंबरशीप नसताना त्या लायब्ररीत जाऊन बसते आणि अभ्यास वगैरे करते. हे ऐकून मी मनाचा हिय्या केला आणि वाचनालयात शिरलो. तिथल्या रिसेप्शनवर साधारण चौकशी केली. जर्मन भाषा बोलता येत असल्याने उत्तरंही अगदी आत्मियतेने मिळाली. लायब्ररीत येऊन बसायला किंवा तिथल्या तिथे कोणतंही पुस्तक वाचायला कोणतीही मेंबरशीप लागत नाही, हे त्या काकूंनी सांगितलं. पण पुस्तकं किंवा इतर साहित्य घरी घेऊन जायचं, तर दहा युरो भरून मेंबरशीप घ्यावी लागेल, हेदेखील ऐकवलं. 

'दरमहा दहा युरो?'

'नाही, वर्षाचे दहा युरो.' वाचनसुंदरी बोलल्या.

इथे माझ्या आईचे घासाघीशीचे संस्कार जागे झाले आणि मी सहज खडा टाकायला म्हणून विचारलं, 'विद्यार्थ्यांना काही सवलत वगैरे?'

त्या काकूंनी मला आपादमस्तक न्याहाळलं आणि म्हणाल्या, 'तू विद्यार्थी आहेस? आयकार्ड वगैरे आहे का?'

पुस्तकांची शिडाळी


परदेशात फिरताना आयकार्ड, पासपोर्ट, भारतातलं आधार आणि पॅन कार्ड अशा सगळ्या गोष्टी सतत बरोबर बाळगण्याचा कोचरेकर मास्तरांचा सावध सज्जनपणा कधी कसा उपयोगी येईल, हे सांगता येत नाही. त्या दिवशी तो माझ्या उपयोगी आला.

'मग वर्षाचे पाच युरो भरावे लागतील', काकूंनी माझ्या आयकार्डवर नजर टाकत सांगितलं.

मी तातडीने पाच युरोची नोट काढली आणि मेंबरशीप घेऊन टाकली.

'ही मेंबरशीप वर्षभर चालेल. तुला एका वेळी ६० गोष्टी घरी घेऊन जाता येतील. यात पुस्तकं, सीडी, मॅगझिन्स, वगैरेंचा समावेश असेल. तू महिनाभर या गोष्टी घरी घेऊन जाऊ शकतोस', त्या काकू बोलत होत्या आणि मला अक्षरश: खेळण्यांच्या दुकानात लहान मुलाला नेऊन 'वाट्टेल ती खेळणी घे' असं सांगितल्यावर त्याचं जसं होईल, तसं व्हायला लागलं होतं. 

तेव्हापासून या बर्लिनमधल्या लायब्ररी संस्कृतीशी माझी तोंडओळख झाली. इथल्या समाजजीवनात या वाचनालयांचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. त्यांच्या देखरेखीसाठी सरकार व्यवस्थित तरतूद करतं. वाचनालय छोटं असो वा मोठं, प्रत्येक वाचनालयात सीडीजचं कलेक्शन असतं. तुम्हाला तिथेच बसून सीडी बघायची असेल, तर कम्युटरची सोयही असते. मुख्य म्हणजे कोणालाही मुक्त प्रवेश असतो. कोणतंही पुस्तक घेऊन वाचत बसण्याची मुभा असते. हे म्हणजे माझ्यासारख्या वाचन वेड्यासाठी अतिच झालं.

American Library ची विस्तीर्ण इमारत



खरं तर त्या लायब्ररीची पायरी चढलो, ते मुळात वाचनासाठी नाही, तर पहिल्या सेमिस्टरसाठी असलेले प्रोजेक्ट लिहायला एखादी शांत जागा मिळावी म्हणून! याच शोधात Hanza Bibliothek वरून आमच्या युनिव्हर्सिटीजवळ Halleshes Tor या परिसरात असलेल्या American Memorial Library मध्ये पोहोचलो. या लायब्ररीची इमारतच प्रचंड विस्तीर्ण आहे. आतमध्ये पुस्तकांची अनेक शिडाळी आणि त्याच्या बाजूला बसण्यासाठी खूप सारी टेबलं आणि खुर्च्या असं स्वरूप आहे. प्रत्येक लायब्ररीत वाय-फाय अगदी मोफत असतं. तुम्ही तिथे काम करत बसलात, तर ते वाय-फाय वापरू शकता. अर्थात प्रत्येक लायब्ररीच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पण ही नवी लायब्ररी सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास सुरू असते. अपवाद फक्त शनिवार-रविवारचा. हे दोन दिवस ती लायब्ररी संध्याकाळी सातपर्यंतच वापरता येते.



इथल्या शिडाळ्यांवर सहज बघताना एक पुस्तक मला आवडलं. मी ते हातात घेतलं आणि तिथल्या रिसेप्शनवर जाऊन त्यांना म्हटलं की, माझ्याकडे Hanza Bibliothek ची मेंबरशीप आहे. त्या कार्डवर मी इथे पुस्तक घेऊ शकतो का?

हसून ती मुलगी म्हणाली, 'तू हे कार्ड बर्लिनमधल्या कोणत्याही पब्लिक लायब्ररीत वापरू शकतोस.'

मी हर्षवायूने आडवा पडणार होतो. वर्षभरात फक्त पाच युरोंमध्ये बर्लिनभरच्या कोणत्याही लायब्ररीत जाऊन तिथली पुस्तकं, सीडी, मॅगझिन्स, कॅटलॉग्ज महिन्याभरासाठी घेऊन जाऊ शकतो, हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. मी तडक ते पुस्तक माझ्या नावावर घेतलं.




या वाचनालयांमध्ये मला जाणवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ प्रकाश येण्याची सोय! पुस्तकं शिडाळ्यांमध्ये छान पद्धतशीरपणे रचलेली असतात. प्रत्येक शिडाळ्याच्या सुरुवातीला एक कम्प्युटर स्क्रीन आहे. तुमच्या कार्डावरचा नंबर आणि तुम्हाला मिळणारा पासवर्ड टाकून तुम्ही पुस्तकं शोधू शकता. ती पुस्तकं लायब्ररीत कोणत्या शिडाळ्यावर असतील, हे सहज सापडतं. त्यामुळे प्रत्येक वेळी लायब्ररीयनचे पाय पकडावे लागत नाहीत. इथल्या लायब्ररीयनही अगदी तत्परतेने तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात.

मला जर्मन इतिहासाबद्दचं पुस्तक हवं होतं. मी तिथे बसलेल्या एका लायब्ररीयनला विचारलं. तिने मला सांगितलं की, पुस्तक आहे, पण तुला तुझ्या नावावर इश्यू करून घ्यावं लागेल आणि तुला ते उद्या अमुक अमुक वाजता मिळेल. ही पुस्तकं वेगवेगळ्या लायब्रऱ्यांमधून विनंतीनुसार मागवली जातात. एका वेगळ्या भागात ती पुस्तकं घेण्यासाठी वेगळी शिडाळी असतात. पुस्तक तुम्ही तुमच्या नावे नोंदवलंत की, तुम्हाला एक चिठ्ठी मिळते. त्यावर त्या शिडाळ्यात ते पुस्तक दुसऱ्या दिवशी कुठे मिळेल, याची माहिती असते. मग तुम्ही ते पुस्तक ठरलेल्या वेळी तिथे जाऊन घेऊ शकता. 

या सगळ्या लायब्ररीजमध्ये वेगवेगळे उपक्रमही होतात. Hanzaplatz च्या लायब्ररीत एका रविवारी गेलो, तर तिथे चार-पाच म्हातारे Jazz म्युझिक वाजवत होते आणि इतर सगळे त्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. ही मैफिल चांगली तीन-साडेतीन तास सुरू होती. अमेरिकन लायब्ररीत एका ठरावीक दिवशी परदेशातून आलेल्या मुलांना जर्मन भाषेचा सराव व्हावा, म्हणून दोन तासांचं एक सेशन होतं. इतरही अनेक उपक्रम असतात आणि त्या पाच युरोंच्या सदस्यत्त्वाच्या आधारे तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता.




या अमेरिकन लायब्ररीत कॉफी, सँडविचेस, Bagel, पास्ता, चहा वगैरे मिळण्याचीही सोय होती. तुमची आवडती कॉफी घेऊन तुम्ही तुमच्या टेबलावर जाऊ शकता आणि कॉफीचे घुटके घेत मस्त हवं ते पुस्तक वाचत बसू शकता. ही सोय मला स्वत:ला प्रचंड आवडली. मी तर फिल्टर कॉफीचा कप घेऊन मस्त तासन् तास पुस्तकं वाचत पडून राहतो अनेकदा लायब्ररीत!

या लायब्रऱ्यांमध्ये मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे लहान मुलांचा मुक्त वावर! खरं सांगायचं, तर मला या लहान मुलांचा प्रचंड हेवा वाटला. दर संध्याकाळी किंवा आठवड्यातल्या एका संध्याकाळी आई-बाप त्यांच्या मुलांना लायब्ररीत घेऊन येतात. ही पोरंही खांद्यावर एखादी पिशवी, त्यात त्यांची पुस्तकं, डोक्यावर सायकलचं हेल्मेट वगैरे थाटात लायब्ररीत येतात. मुलांच्या पुस्तकांचं एक मोठं दालनच असतं. इथली सजावटही मुलांना हवीहवीशी वाटेल, अशीच असते. मुलं त्यांना हवं ते पुस्तक हाताळतात. मग त्यात कधीकधी मोठ्यांसाठी लिहिलेल्या पुस्तकांचाही समावेश असतो. पुस्तक घेऊन मस्त लायब्ररीतच लोळण मारत ती पुस्तकं चाळतात. मुलांना पुस्तकं वाचायला खास कक्षही आहेत. अशाच एका कक्षात मी डोकावलं. दोन लहान मुली बसल्या होत्या. त्यांचे वडील त्यांना कुठल्या तरी परीकथेच्या पुस्तकातल्या गोष्टीच्या अद्भूत जगात घेऊन गेले होते. ते वडील मस्त अगदी हावभाव करत त्या मुलींना गोष्ट वाचून दाखवत होते आणि डोळे विस्फारून मुली त्या अद्भूताचा आनंद घेत होत्या. ते दृश्य पाहून मीच माझ्या लहानपणात जाऊन पोहोचलो. 

लहान मुलांच्या कक्षाबाहेरची सजावट



असंच एक दिवस लायब्ररीत एक चिमुरडी दिसली. दिसायला अत्यंत गोड पण चोखंदळ वाचकांच्या चेहऱ्यावर असतात तसे भाव घेऊन तो लोकरीचा गोळा टेचात चालत होता. खांद्यावर शबनम पिशवीसारखी पिशवी होती. जेमतेम दोन-अडीच फूट उंचीची ती मुलगी प्रत्येक पुस्तक हातात घेऊन अगदी बारकाईने चाळत होती. आवडलेलं पुस्तक पिशवीत टाकत होती आणि न आवडलेलं पुन्हा शिडाळ्यात ठेवत होती. तिचा तो आविर्भाव पाहून मला हसायला आलं. तिची आईदेखील सोबत होती. तीसुद्धा माझ्याकडे बघून हसली आणि कौतुक वजा 'अशक्य आहे', असा चेहरा केला. 

इतर वेळी वाचनालयात कोणी मोठ्याने बोललं, तर लगेच शेकडो नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळतात आणि बोलणाऱ्याला ही 'धरणीमाता दुभंगून आपल्याला पोटात घेईल, तर बरं,' असं वाटतं. पण तेच लहान मुलांना मात्र इथे मुक्त संचार असतो. ती मुलं कधीकधी मोठ्याने बोलतात, बाबांकडे हट्ट वगैरेही करतात. पण म्हणून त्यांना 'श्शूsss गप्प बस, नाहीतर घरी जाऊन तंगडं तोडतो', वगैरे शब्दांत हटकत नाहीत. अर्थात ती मुलंही आपल्या पालकांचं अनुकरण करत शक्य तेवढं गप्प राहण्याचा प्रयत्न करतात.



बरं या लहान मुलांची पुस्तकंही एवढी देखणी असतात की, एखाद पुस्तक आपल्यालाही हातात घेतल्याशिवाय राहावत नाही. रंगीबेरंगी चित्रं, मोठमोठी चित्रं, अगदी छोटा मजकूर, त्या मुलांच्या बुद्धीला झेपतील एवढेच आणि असेच शब्द! मी जर्मन भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय. चांगला क्लास वगैरेही लावलाय. पण खरी शिकवणी सुरू झाली ती, या लहान मुलांच्या पुस्तकांपासूनच...


लहान मुलांसाठीची पुस्तकं घेऊन मीदेखील जर्मन भाषेशी झटापट करतो.


असाच एकदा लायब्ररीत बसलो होतो. Project submission ची deadline अगदी जवळ आली होती. त्यामुळे अक्षरश: हातघाईची लढाई सुरू होती. तेवढ्यात नजर वर गेली आणि एका जोडप्यावर स्थिरावली. दोघंही भारतीय होते. बहुधा उत्तरेतल्या राज्यातले असावेत. कारण ज्या शारीर ओढीने ते एकमेकांच्या जवळ बसले होते, ती जवळीक उत्तरेकडच्या राज्यांमधल्या मुलामुलींमध्ये सार्वजनिक ठिकाणी कधीच दिसत नाही. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. मी आपली नजर खाली करून प्रोजेक्टमध्ये डोकं खुपसलं. काही वेळाने पुन्हा वर बघितलं, तर आता त्यांची शारीर जवळीक वाढली होती आणि ते एकमेकांचं चुंबन घेत होते. त्यांच्या समोर एक मुलगी होती. बहुधा जर्मन किंवा युरोपातल्या देशातलीच असावी. आजूबाजूला अनेक लोक होते. पण माझी सोडून कोणाचीही नजर त्यांच्यावर नव्हती. मीदेखील समजूतदारपणा दाखवला आणि प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत पुन्हा वर म्हणून बघितलं नाही. पण त्या दोघांकडे बघताना रवीश कुमारच्या 'इष्क में शहर होना'ची आठवण होत होती. कोण जाणे, पुढेमागे तो मुलगाही बर्लिनमधल्या प्रेमाच्या 'लघु प्रेम कथा' लिहायचा! शहर समजून घ्यायचं, तर प्रेमात पडायला हवं. इथे मी तर या शहराच्याच प्रेमात पडून राहिलोय!

असंच एक जोडपं दिसलं. दोघीही मुली होत्या. वेगवेगळ्या टेबलांवर बसल्या होत्या. पण दर थोड्या वेळाने एकमेकींच्या खुर्चीजवळ यायच्या. गळ्यात गळे घालायच्या. हलकेच गालावर किस करायच्या आणि पुन्हा आपापल्या जागी जाऊन कामाला सुरुवात करायच्या. मला जशी अधेमध्ये कॉफीची किक् हवी होती, तशीच त्यांना एकमेकींच्या सहवासाची किक् हवी होती. 

सतत लायब्ररीत जाऊन काही चेहरे ओळखीचे झाले. त्यातलाच एक चेहरा होता लायब्ररीतल्या सिक्युरिटी गार्डचा!  सिक्युरिटी गार्ड, वॉचमन, वेटर, रिक्षावाले वगैरेंशी दोस्ती जमवण्याच जुना छंदच आहे मला. त्यामुळे या रक्षक महाशयांना बघितलं की, मी हसून हॅलो म्हणायचो. साधारण पन्नाशीचा हा माणूस! वंशाने बहुधा जर्मन नसावा. पण हयात बर्लिनमध्ये गेली असेल. हळूहळू तोसुद्धा मला प्रतिसाद द्यायला लागला. पुढेमागे 'अमुक जागी बस, तिथे रेंज चांगली मिळते', वगैरे टिप्सही द्यायला लागला. दोन-तीन दिवस लायब्ररीत जायला जमलं नाही. चौथ्या दिवशी गेलो, तर डोळे मोठे करून वगैरे मला दटावणीच्या सुरात विचारलं, 'होतास कुठे?' त्याच्या सोबतीला एक काकूदेखील नेहमी असतात. त्यांचीही तोंडओळख झाली. त्यादेखील मस्त हसतात आता. तशीच पेंट्रीमधली एक मुलगीही ओळखीची झाली. व्हिएतनाम किंवा कोरियाची असावी. तिला माझी फिल्टर कॉफीची ऑर्डरही पाठ झाली होती. 




दिल्लीतला माझा सखा पराग, त्याला मी या लायब्ररीबद्दल सांगत होतो. आमच्या असंख्य समान आवडींपैकी वाचन ही सर्वात वरच्या स्तरावरची आवड! त्याला सगळे फोटो दाखवले, माझा अनुभव ऐकवला. त्यावर त्याची प्रतिक्रिया अगदी सहज पटणारी होती. 'First world आणि Third World देशांमधला फरक नेमका हाच आहे'! 

जर्मन साहित्याची आणि साहित्यिकांची काही संमेलनं वगैरे होतात की नाही, माहीत नाही. साहित्य लोकाभिमुख व्हायला हवं, वाचनसंस्कृतीची वृद्धी वगैरे विषयांवर इथे परिसंवादही होत नाहीत. पण लोक वाचतात. इथलं सरकार लोकांच्या वाचनाची आवड आणखी समृद्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करतं. ट्रेन किंवा ट्राममध्येही अनेक जण पुस्तकं वाचताना अगदी सर्रास दिसतात. मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा पुस्तकात डोकं खुपसणं इथल्या लोकांना आवडतं. ही सवय ते त्यांच्या मुलांनाही लावतात. त्यामुळे मुलांच्या हातातही एखादं पुस्तक सहज दिसतं.

मी MA च्या दुसऱ्या वर्षाला कालिना युनिव्हर्सिटीत शिकत होतो. 'Archaeology, Museology & Library Science' असा एक विषय अभ्यासाला होता. काहीही केलं, तरी त्यातलं फारसं काही समजायचं नाही. परत समजलं, तरी स्वत:च्या शब्दांत लिहिणं प्रोफेसर लोकांना मान्य नव्हतं. त्यांना कोणत्या ना कोणत्या इतिहासकाराने काय म्हटलं, यात जास्त स्वारस्य होतं. शेवटी मला जे म्हणायचं होतं, त्याला इतिहासकारांच्या नावाचं कुंकू लावण्यासाठी मीच दोन इतिहासकारांना जन्म दिला. त्यातलं एक नाव होतं जर्मन 'Rohandin Tillston' आणि दुसरा इतिहासकार होता 'Rohashiva Tiliuka' नावाचा जपानी! त्यातल्या एकाच्या तोंडी मी मला सुचलेलं एक वाक्य टाकलं होतं, 'Libraries and Museums are temples of History writing.' म्हणजे 'इतिहास लेखनासाठी वाचनालयं आणि वस्तुसंग्रहालयं एखाद्या मंदिरासमान आहेत.' आज इतक्या वर्षांनी पुन्हा मास्टर्स करताना यात थोडासा बदल करावासा वाटतो. 'Libraries are the treasure of happiness and knowledge.' 

नजर जाईल तिथपर्यंत पुस्तकांची शिडाळी


हा आनंदाचा ठेवा फारा वर्षांनी बर्लिनमध्ये गवसला. मी २०-२२ वर्षांचा होतो त्या दिवसांची आठवण झाली. कलिनाच्या त्या जवाहरलाल नेहरू वाचनालयात असंच उन्हं ढळेपर्यंत नोट्स काढत बसायचो. उन्हं उतरली की, सेंट्रल कँटिनला जाऊन छोले-समोसे खायचो आणि एकुलत्या एका तळ्याच्या काठी सगळे वादग्रस्त विषयांवर चर्चा करत बसायचो. तो एक अड्डाच होता. त्या अड्ड्यात माझ्यापेक्षा खूप खूप वाचणारी अनेक मंडळी होती. त्यांनी मला आतापर्यंत खूप समृद्ध केलं. इथे तसा अड्डा अजून जमला नाही. तो जमवण्याच्या तयारीत मी आहे. फक्त कोणीतरी छोले-समोसे तेवढे पाठवा!

Comments

Popular Posts