शेवटी एक कलंक पुसला गेला...
गेली अनेक वर्षं आपण समाज म्हणून आणि एक राष्ट्र म्हणून एक मोठा कलंक वागवत वावरत होतो. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालामुळे हा कलंक पुसला गेला. 'उदारमतवादी, प्रगत, पुढारलेल्या' इत्यादी इत्यादी ब्रिटिशांनी समलैंगिकता कायद्याने गुन्हा ठरवली तेव्हापासून हा कलंक लागला होता. पुढे स्वातंत्र्यानंतरही या कायद्याचं उच्चाटन करावं, असं कोणाला वाटलं नाही. हा डाग आपण वागवत राहिलो आणि आता स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षांनी का होई ना, हा डाग आपण थोडाफार पुसून काढला.
एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी हा खरंच खूप मोठा दिवस आहे. मी समलैंगिक आहे अथवा नाही, ही गोष्ट या ठिकाणी मला दुय्यम वाटते. पण मी ज्या राष्ट्रात राहतो, त्या राष्ट्रातल्या थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल दोन कोटी लोकांना त्यांच्या लैंगिक ओळखीला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली, हेच माझ्यासाठी एक व्यक्ती आणि एक समाज म्हणून लाजीरवाणं होतं. हा दोन कोटींचा आकडाही अधिकृत असला, तरी अंदाजपंचे असाच आहे. कदाचित एका मोठ्या वर्गाने भयापोटी आपलं लैंगिक प्राधान्य लपवलं असल्याची शक्यता जास्त आहे. ते उघड होईल, तेव्हा हा आकडा यापेक्षा मोठा असेल, यात वाद नाही.
याचं मुख्य कारण म्हणजे आपण कोण आहोत, आपलं लैंगिक प्राधान्य काय आहे, याचं भानही अनेकांना नसतं. काहींना ते असलं, तरीही 'लोक काय म्हणतील', 'घरातले काय म्हणतील', या भीतीपोटी ते काहीच बोलत नाहीत. ते एक प्रकारचा न्यूनगंड घेऊनच वावरत असतात. त्यांचीही चूक नाही. मी ज्या समाजात वावरतो तिथे बहुसंख्य लोक जे करतात, तो समाजनियम मानला जातो. पण मग अशा वेळी उरलेले थोडे आहेत, तेदेखील या समाजाचाच भाग आहेत, त्यांचं मत काहीतरी वेगळं असू शकतं, हेच आपण विसरतो. मग बहुसंख्य करतात ते नैसर्गिक आणि अल्पसंख्य करतात ते अनैसर्गिक अशी ढोबळमानाने विभागणी होते.
एका मध्यमवर्गीय वातावरणातच लहानाचा मोठा झालेल्या मुलावर 'संस्कारां'च्या नावाखाली जे केलं जातं ते माझ्याही मनावर बिंबवलं गेलं होतं. पण याच संस्कारक्षम वयात आलेला एक अनुभव! हाच अनुभव पुढे सचिन कुंडलकरच्या 'कोबाल्ट ब्लू'मध्ये वाचला होता. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका मुलाने खेळण्याच्या बहाण्याने शारीरिक जवळीक साधली होती. श्लील-अश्लील, शरीरसंबंध, लिंगात ताठरता, लैंगिक सूख, कामक्रीडा वगैरे शब्द चुकूनही कानावर पडण्याची शक्यता नसलेलं ते वय होतं. 'राम तेरी गंगा मैली'मधला मंदाकिनीचा तो धबधब्याचा सीन लागला आणि घरात मी कुठेही असलो, तरी टीव्ही बंद करण्याचा तो काळ होता. त्यामुळे वयाने मोठ्या असलेल्या त्या मुलाचा तो स्पर्श मला धक्का देऊन गेला होता. पण त्याच बरोबर एक गोड संवेदनाही शरीरात निर्माण झाली होती.
मनात कामूक भावना येण्याचा आणि शारीरिक वय वाढण्याचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो, हे या वयाने मोठ्या असलेल्या मुलामुळे आणि अशाच आणखी एका वयाने मोठ्या असलेल्या मुलीमुळेही लहानपणीच कळलं होतं. तर त्या वेळी त्या मुलाने त्याच्या शरीराची गरज माझ्यावर आणि कदाचित माझ्यासारख्या काही इतरही मुलांवर भागवली असावी. ती मुलं याबाबत आता काय विचार करतात, माहीत नाही. पण माझ्या लैंगिक आयुष्यावर या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झाला.
योगायोगाने त्याच वेळी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीच्या भावनाही भडकल्या होत्या. घर-घर खेळण्याच्या बहाण्याने तिनेही काही प्रात्यक्षिकं दाखवली. ७-८-९ वर्षांच्या मुलाला त्यातलं काही कळेल, याची शक्यताच नव्हती. पण ते कुठेतरी आवडत होतं, हे आता लक्षात येतं.
एक पुरुष म्हणून आपल्याला दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श हवाहवासा वाटतो का, त्याची किळस येते का, असे अनेक विचार मी जरा समज यायला लागल्यावर माझ्याही नकळत करत गेलो. कॉलेजला जायला लागल्यावर मुंबईतल्या लोकल ट्रेनचे धक्के खाणं रोजचंच झालं. याच लोकल ट्रेनमधला एक प्रसंगही खूप खोलवर जाऊन बसला आहे.
बारावीच्या बोर्डाची परीक्षा होती. माटुंगा-वडाळा भागात सेंटर असल्याने संध्याकाळी ६ वाजता पेपर सुटल्यावर दादरहून स्लो ट्रेन पकडली. मुंबईच्या ट्रेनमधली संध्याकाळची गर्दी. ठाण्याला उतरायला मिळावं, म्हणून दरवाज्याजवळच्या जाळीला टेकून उभा होतो. विक्रोळीपासूनच एक हात माझ्या पँटच्या वरून माझं लिंग कुरवाळायला लागला. इच्छा नसतानाही लिंग ताठरलं होतं. त्याचा वेगळाच अर्थ त्या हाताने घेतला. त्या हाताची हालचाल वाढायला लागली. गर्दी हटायचं नाव घेत नव्हती. माझी घुसमट वाढत होती. जोरात ओरडावंसं वाटत होतं, त्या हाताला हिसका देऊन दूर करावंसं वाटत होतं. पण भीतीही वाटत होती. लोकांनी आपल्यालाच मारलं तर, असं वाटत होतं. पण त्या वेळी त्या स्पर्शाची किळस वाटली, एवढं नक्की! ठाण्याला उतरलो तेव्हा थरथरत होतो. प्लॅटफॉर्मवरच्या एका चौथऱ्यावर मटकन खाली बसलो आणि काय झालं त्याचा विचार करत राहिलो. माझ्यासाठी माझं सेक्शुअल ओरिएण्टेशन तेव्हाच ठरलं होतं.
एवढं सगळं होऊनही पुरुषांबद्दल आकर्षण असलेल्या लोकांबद्दल घृणा वाटत नव्हती. पुढेपुढे पुरुषांना जसं पुरुषांबद्दल आकर्षण वाटतं, तसंच मुलींनाही मुलींबद्दल वाटतं, हे कळलं. पहिल्यांदा नवल वाटलं. पण नंतर ब्लू फिल्मची तिळा उघडली आणि हे स्त्रियांचं एकमेकींबद्दलचं आकर्षण प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलं तेव्हा विश्वास बसला. तोपर्यंत सेक्स किंवा शरीरसुख या गोष्टीचा भावनिक पातळीवर कधीच विचार झाला नव्हता. कदाचित लहानपणी दोन भिन्न लिंगांच्या व्यक्तींकडून मिळालेल्या अनुभवांमुळे असेल, पण 'यात भावना कुठे गुंतलेल्या असतात' असंच वाटत होतं.
हळूहळू वाचन वाढलं (वाचन म्हणजे अश्लील पुस्तकांचं वाचन नाही. इतर वाचन) आणि एकेक कंगोरे उलगडत गेले. काही कादंबऱ्या वाचनात आल्या, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे अमूल्य पुस्तक वाचलं, काही पाश्चात्य लेखकांची पुस्तकं वाचली. मनाची जडणघडण होण्याचा, एक विचारपद्धती विकसित होण्याचा हा काळ होता. या प्रक्रियेने मला खूप खुलं बनवलं. आपल्या विचारांच्या चौकटीबाहेरही विचार असू शकतात, ते आपल्याला पटायलाच हवे असं नाही. पण ते असतात आणि त्यांचा आदर केला पाहिजे, ही बैठक पक्की होत होती. एखादा विचार पूर्णपणे झटकून तो चूकच आहे, हे ठरवण्याचा आतातायीपणा कमी होत होता. याच वेळी कुठेतरी लैंगिकता आणि समलैंगिकता याबद्दल मित्रांशी, मैत्रिणींशी बोलणीही होत होती.
तेव्हाही हीच भूमिका पक्की होती की, 'ज्याला ज्या खड्ड्यात पडायचंय, त्याने दुसऱ्यांना त्रास न देता त्या खड्ड्यात पडावं'. थोडक्यात माणूस हा समाजशील प्राणी आहे, हे जरासं खटकत होतं. माणसाला आपल्या स्वत:च्या स्पेसमध्ये राहायला आवडतं. त्याला ती स्पेस जपायला आवडतं, हे समजत गेलं. भारतीय संस्कृती ही खरं तर स्वत:ला स्वत:ची मोकळीक देणारी संस्कृती! पाश्चात्य देशांमध्ये माणसाची स्पेस जपली जाते, हे वाक्य आपण सर्रास ऐकतो. पण ईश्वराशी संवाद साधायला तिथे जथ्थ्याने जावं लागतं. आपल्याकडे एकट्याने ध्यान लावायची परंपरा आहे.
हे ध्यान लावणं किंवा स्वस्थ बसणं, याला खूप महत्त्व आहे. स्वस्थ यात स्वत:चा शोध घेणं आहे. हा शोध एकट्याने घ्यायचा असतो. नेमकं लैंगिकतेचा शोधही एकट्याने घ्यायचा असतो. तसंच ही एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे, हे नेमकं याच वयात जाणवत होतं. मी कोणाशी लैंगिक संबंध ठेवावे, यावर सर्वस्वी माझा अधिकार असायला हवा, ही भावना बळावत होती. तसंच हे संबंध ठेवताना मी दुसऱ्याला हानी पोहोचवत नाही ना, दुसऱ्याच्या मनाविरुद्ध वागत नाही ना, याचीही काळजी घेतली पाहिजे, हे रूजत होतं.
योगायोगाने याच काळात आमच्या एका मित्राने आम्हाला येऊन तो गे असल्याबद्दल सांगितलं. आपल्या एवढ्या जवळची व्यक्ती गे असू शकते आणि त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, याचं तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. पण पहिल्यांदा समलैंगिक समुहातल्या एखाद्या व्यक्तीला मी त्या वेळी पाठिंबा दिला होता. अजूनही त्याचा तो आश्वस्त चेहरा आठवतो.
माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट म्हणजे तो मित्र नंतर भारत सोडून दुसऱ्या देशात स्थायिक झाला. त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे भारतात समलैंगिक संबंधांना असलेलं गुन्हेगारीचं स्वरूप! कोणीतरी चपराक दिल्यासारखी अवस्था झाली होती. माझा एक मित्र माझ्या देशात गुन्हेगार ठरतो कारण त्याला स्त्रीबद्दल नाही, तर पुरुषाबद्दल आकर्षण वाटतं? इथे विचारप्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
याच दरम्यान लैंगिकत्त्व आणि धर्म व संस्कृती यांचं कधीच नसलेलं नातं जोडलं जाऊ लागलं. काही स्वप्रमाणित हिंदू आणि मुस्लीम धर्मरक्षक संघटना या समलैंगिकतेला ठेचून काढण्याची भाषा करू लागल्या. ते अनैसर्गिक असल्याचं म्हणू लागल्या. पण जन्मापासून किंवा कळायला लागल्यापासून एखाद्या व्यक्तीला समान लिंगाच्या व्यक्तीबद्दलच भावना मनात येत असतील, तर ते अनैसर्गिक कसं, हे कोडं मला सुटत नव्हतं.
माझ्या मते, या सगळ्याचं मूळ भारतीय विवाहसंस्थेत दडलं आहे. प्रजोत्पादनाचा मार्ग विवाहसंस्थेच्या मांडवातून जातो, असं आपली विवाहसंस्था सांगते. म्हणजे विवाह करायचा, तो प्रजोत्पादनासाठी हा एक विचार विवाहसंस्था देते. लग्न करणारे बहुतेक जण त्यांच्याही नकळत याच साठी बोहल्यावर चढतात. सेक्स करण्यासाठी एक हक्काची जोडीदारीण मिळत असते. प्रजोत्पादन होतं, पण ते बहुधा नकळत किंवा गफलतीने होतं. अनेक जण जाहीरपणे मान्य करणार नाहीत, पण पहिल्यांदा झालेलं मूल हे बहुधा अपघातानेच झालेलं असतं. मग हे अपघात काहींच्या बाबतीत वारंवारही घडतात.
मुद्दा हा की, जिथे विवाहानंतर 'नांदा सौख्यभरे' यापेक्षाही 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' हा आशीर्वाद महत्त्वाचा आहे तिथे समलैंगिक विवाह झाले किंवा समलैंगिक शरीरसंबंध प्रस्थापित झाले, तर त्याची फलनिष्पत्ती काय, हा प्रश्न पडणारच. यांना सेक्स करून पोरं होणार नाहीत, मग काय उपयोग, अशा आशयाचा विरोध होऊ लागला. पण प्रजा वाढवण्यासाठी संभोग, हे जनावरांच्या पातळीवर ठीक आहे. माणूस हा जनावर असला, तरी स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेणारा प्राणी आहे. ८४ लक्ष वगैरे योनींमधून फिरून आल्यानंतर या जन्मात येणारा प्राणी आहे. त्यामुळे 'प्रजोत्पादनासाठी संभोगाच्या' पलीकडे जाऊन 'सुखासाठी संभोग' ही धारणा माणसात असते.
संभोगातलं हे सुख काहींना भिन्न लिंगाच्या व्यक्तीबरोबर शरीरसुख घेऊन मिळतं, तर काहींना समान लिंगांच्या व्यक्तीबरोबर! हे सुख कोणी कसं घ्यावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण नेमकं हेच काहींना पटत नाही. या वेळी पार्च्ड या चित्रपटातला राधिका आपटेचा तो गाजलेला सीन आठवला. हॉट सीन म्हणून व्हायरल झालेला तो सीन चित्रपटात बघितला, तेव्हा अंगावर आला होता. एका बाईच्या शरीराची व्यथा समजून घेऊन तिच्या नग्न शरीरावर तेवढ्याच हळूवारपणे हात फिरवणारी दुसरी बाई... त्या अपरिचित पण हव्या हव्या वाटणाऱ्या स्पर्शाने मोहरून गेलेली राधिका आपटे... समलैंगिक संबंध या समाजातल्या लोकांना का महत्त्वाचे वाटत असावे, याचं इतक उत्तम उदाहरण दुसरं नसेल.
समलैंगिक संबंधांना विरोध करण्यात अनेक बाबा-बुवा-महंत आघाडीवर असल्याचं गेले काही महिने बघायला मिळत होतं. पण मंदिराच्या आवारांमध्ये होणाऱ्या समलैंगिक संबंधांबद्दल इतकं लिहिलं गेलं आहे, त्याचं काय? कथा-कादंबऱ्यांमध्ये एवढंच नाही, इतिहासातही 'लाडका गुलाम' असे संदर्भ येतात, त्याचं काय? कीचकाकडे 'बृहन्नडे'चं रूप घेणाऱ्या अर्जुनाचं काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतील. काही कादंबऱ्यांमध्ये पूर्वी घरातल्या दोन पुरुषांमधल्या किंवा दोन बायकांमधल्या संबंधांचे दाखले वाचले आहेत. कादंबरी ही शेवटी समाजाचा आरसा असते. म्हणजे त्या वेळी किंवा आताही कदाचित घराघरातही समलिंगी संबंध ठेवले जात असतील. पण त्याची वाच्यता केली जात नसावी.
आतापर्यंत समलैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा असल्याने या सगळ्यांची कुचंबणा होत होती. ती किती होत असेल? काहींना तर केवळ समाजाच्या भयाने त्यांच्या शरीराविरुद्ध आणि मनाविरुद्ध भिन्न लिंगातल्या व्यक्तींशी लग्न करावं लागलं असेल. त्या लग्नातून कदाचित संततीही झाली असेल. पण अशा व्यक्तीला आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक कुचंबणेला तोंड द्यावं लागलं असेल. अशा वेळी फ्रॉईड आठवतो. तुमच्या सगळ्या मानसिक रोगांचं निदान तुमच्या कामजीवनातल्या समस्येत आहेत, असं सांगणारा! या समस्यांमुळे होणारे रोग माणसाला विकृतीच्या टोकावर, घेऊन जाऊ शकतात, असं फ्रॉईड म्हणतो.
समलैंगिक समाजातल्या लोकांवर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे त्यांचे चित्रविचित्र पोशाख, त्यांचं कानात डूल, नाकात नथ वगैरे घालून फिरणं! पण इथेही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही एक प्रतिक्रिया आहे. समाजाचं मनोविश्लेषण करणं हे ज्यांचं काम आहे, ते कदाचित ही गोष्ट जास्त योग्य पद्धतीने उलगडून सांगतील.
साधं उदाहरण. तुम्हाला समाज विनाकारण अव्हेरायला लागला, तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागला, तुमचं अस्तित्त्व नाकारायला लागला, तर तुम्ही काय कराल? तुमच्या मनाविरुद्ध असलं, तरी सुरुवातीला समाजाशी मिळतंजुळतं असं वागायला लागाल. पण तरीही समाज बदलला नाही, तर? तुमच्यासारख्याच काहींना एकत्र घेऊन तुमचा आवाज समाजाच्या कानी पोहोचवण्याचा प्रयत्न कराल! तरीही समाज बधला नाही, तर? तर म्हणाल, 'गेलात बा झवत... आता मला हवं तसंच मी वागणार'! समलैंगिक समाजाचं वागणं नेमकं याच प्रतिक्रियेतून आलेलं आहे.
संस्कृतीरक्षक म्हणवणाऱ्यांनी, आपल्या विचारांच्या चौकटीबाहेरच्या विचारांना विरोध करणाऱ्यांनी ज्ञानेश्वरांचं पसायदान एकदा ऐकायला हवं. ते म्हणतात, 'जो ते वांच्छिल, तो ते लाहो' म्हणजे ज्याला ज्याची इच्छा आहे, त्याला ते मिळो! हे केवढं मोठं मागणं त्यांनी विश्वात्मक देवाकडे मागितलं होतं. पण त्या आधी त्यांनी काय मागितलं, तर 'जे खळांची व्यंकटी सांडो, तयां सत्कर्मी रती वाढों' म्हणजे काय, तर खल म्हणजे दुष्ट लोकांच्या मनातलं वाकडेपण सांडो म्हणजे कमी होऊ दे. तसंच त्यांच्या मनात सत्कर्म करण्याची इच्छा वाढीला लागू दे! एकदा हे झालं की, कोणी काही वाकडं मागणं मागणारच नाही.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निकालानंतर मनावरचं एक ओझं उतरल्यासारखं वाटलं. आता खळांची व्यंकटी सांडेल, असा विश्वास निर्माण झाला. तसंच जो जे वांच्छिल त्याला ते मिळेल, असंही वाटलं. हा काही अंतिम विजय नाही. अजूनही समलैंगिकांच्या लग्नाला मान्यता मिळायची आहे. समाजाने त्यांना स्वीकारायचं आहे. पण हे ही नसे थोडके!
साडेअकराच्या सुमारास हा निकाल जाहीर झाला. माझा मित्र असलेल्या त्या दूर देशात तेव्हा मध्यरात्र झाली होती. तरीही त्याला मेसेज केला, परत ये... भारताने तुला तू आहेस तसं स्वीकारलंय...!
Comments
Post a Comment