यह है दिल्ली मेरी जान...



सप्टेंबरने काळाचा बॅटन ऑक्टोबरकडे पास केला की, दिल्लीतलं वातावरण कूस बदलायला सुरुवात करतं. सप्टेंबरपर्यंत वातावरणात एक वेगळ्याच प्रकारचं जडत्व साचलेलं असतं, पण ऑक्टोबर आला की, सप्तपर्णीच्या फुलांचा दरवळ गल्लोगल्ली दरवळू लागतो आणि त्या दरवळाबरोबरच हवादेखील मोकळी होऊ लागते.

दिल्लीतला हिवाळा ही खरं तर लिहिण्याची नाही, तर अनुभवण्याची गोष्ट आहे. या चार-पाच महिन्यांसाठी दिल्ली काहीतरी वेगळीच होऊन जाते. दिल्लीतला कडकडीत उन्हाळा मे महिन्याच्या अखेरीस सुरू होतो. दिल्लीतली हवा परधार्जिणी आहे असं म्हणतात. म्हणजे उन्हाळ्यात राजस्थानची वाळू तापली की, दिल्ली तापते. तिथे धुळीची वादळं आली की, दिल्लीत वावटळ येते. त्याउलट हिवाळ्यात वर शिमला-काश्मीर वगैरे ठिकाणी बर्फ पडला की, दिल्ली गारठायला सुरुवात होते.

मुंबईसारख्या समुद्रकिनाऱ्यावरच्या शहरात जन्म होऊन वयाची चांगली ३०-३२ वर्षं काढलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीचा थंडीशी परिचय जवळपास नाहीच. मुंबईत थंडी म्हणजे रात्री झोपताना साध्या चादरीऐवजी सोलापुरी चादर पांघरणं. कानटोप्या, जाकिटं, स्वेटर वगैरेंची खरेदी मुंबईकर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रवासाला निघाला, तरच करतो. फार तर रिकाम्या लोकल ट्रेनमध्ये पंखे बंद करून मुंबईकर बसला की, समजावं मुंबईत थंडी पडली.

दिल्लीत आलो तेव्हापासूनच या शहराने भूरळ घालायला सुरुवात केली. विस्तीर्ण उद्यानं, मोकळे आणि ऐसपैस रस्ते, तशीच प्रशस्त घरं, रस्त्यांच्या दुतर्फा झाडं, शहराच्या मध्यभागी असलेली जंगलं, इथली खाद्यसंस्कृती या सगळ्यामुळे हे शहर आपलंसं वाटायला लागलं होतं.



दिल्लीत पाय टाकला तेव्हा ४८ अंश सेल्सिअस एवढं तापमान होतं. दिल्लीतली हवा कोरडी असते, तिथे मुंबईसारखा घाम येत नाही पण भाजायला होतं, असं अनेकांकडून ऐकलं होतं. हे ज्ञान अर्धवट आहे, हे अनुभवांती कळलं. अर्धवट अशासाठी की, दिल्लीत भाजायला होतं हे अगदी खरं होतं. इथली हवा कोरडी आहे, हेसुद्धा खरं. पण इथे मुंबईसारखा घाम येत नाही, हे धादांत खोटं असल्याचं पहिल्याच दिवशी कळलं.

हा उन्हाळा दिल्लीतल्या थंडीएवढाच कडक! नाक्यावरच्या अमृतसरी नान, छोले-कुलचेवाल्यांकडली वर्दळ कमी झाली आणि जागोजागी 'छास' (उच्चारी छाछ) विकणारे लोक दिसायला लागले की, दिल्लीत उन्हाळा आला असं समजावं. थंडीतून उन्हाकडे जाताना हवा अलवार कुस वगैरे बदलत नाही. जे काही होतं, ते थेट लोळणं असतं.

हळूहळू त्या उन्हाळ्याला शरीर सरावतं तोच ऑगस्ट येतो. दिवसभर अंगाची काहिली होते. पण संध्याकाळी मात्र कोणीही कुंडी न फिरवता हवेचा पंखा सुरू व्हावा, तशी हवा सुरू होते. संध्याकाळभर फिरत राहावं, असं वाटतं. सप्टेंबरमध्ये हा पंखा आणखीच जोरात फिरायला लागतो. 

उन्हाळ्याकडून थंडीकडे येताना एखाद्या कमालीच्या तयारीने गाणाऱ्या गायकाने हळूहळू मैफिल जमवत रागाच्या अंतरंगात शिरावं, तसं काहीसं होतं. ऋतू बदलत असल्याची वर्दी देतात ती रस्त्यावरची झाडं.



रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची पानं खालच्या लोण्यासारख्या मऊ डांबरट रस्त्याला झाकून टाकतात. दिल्लीतल्या अनेक विस्तीर्ण उद्यानांमध्ये तर सुकलेल्या पानांचा गालिचाच अंथरल्यासारखा वाटतो. मग हवेतला नकोसा चिकटा कमी होत जातो. संध्याकाळी हवेत 'बटर चिकन'सारखा वास घमघमायला सुरुवात होते. 

ऑक्टोबर सुरू होतो आणि मग थंडीचे वेगवेगळे रंग दिसायला सुरुवात होते. सगळ्यात आधी बदलतात ते अंगावरचे कपडे! दिल्लीकरांकडे उन्हाळ्यात घालायचे आणि थंडीसाठीचे असे कपड्यांचे वेगवेगळे जोड असतात. खास थंडीसाठी म्हणून दरवर्षी नवी खरेदी केली जाते. विंटर फॅशन जोरात असते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अंगावर एका जॅकेटपासून सुरू झालेला हा सिलसिला जानेवारीपर्यंत अंगावरचे कपडे, त्यावर स्वेटर, त्यावर जॅकेट, कानटोपी, ग्लोव्ह्ज आणि संपूर्ण पाय झाकणारे बूट इथपर्यंत येऊन थांबतो.

दिवस छोटा व्हायला लागतो. संध्याकाळी साडेचार-पाचलाच अंधार पडायला सुरुवात होते. सकाळी सातपर्यंत चांगला काळोख असतो. या काळोखाच्या घोंगडीबरोबरच दाट धुक्याची दुलई दिल्लीने लपेटून घ्यायला सुरुवात केली की, मग थंडी आली असं दिल्लीकर मानतात.

ही थंडी अंगात कापरं भरवते. पण 'चला, बाहेर फिरायला' असं म्हणत दिल्लीकरांना घराबाहेर खेचते. हौज खास, लोधी गार्डन अशी उद्यानं माणसांनी फुलतात. उन्हाचा तुकडा अंगावर पडावा, म्हणून दिल्लीकर आकाशाकडे नजर लावून असतो.



घरातल्या एअरकंडिशनिंग यंत्रांना सुटी मिळते आणि हिटर मात्र चांगलेच तापतात. चांगल्या गुंडाळून ठेवलेल्या दुलया, ब्लँकेट्स बाहेर पडतात. हळूहळू सकाळी आणि संध्याकाळी गार वाटायला सुरुवात होते. इतके दिवस जरेसारखी असणारी दिल्ली कात टाकून एखाद्या अल्लड नवयौवनेसारखी दिसायला लागते आणि बेडरूममध्ये फिरणारा पंखा 'पाच-तीन-दोन' या क्रमाने एकवर येऊन टेकतो.

सकाळी नऊ-नऊ वाजेपर्यंत बिछान्यातून बाहेरच पडू नये, असं वाटतं. उकळतं पाणी आंघोळीसाठी काढून टॉवेल घ्यायला म्हणून बाहेर यावं, तोपर्यंत पाणी कोमट झालेलं असतं. पण त्या उन-उन पाण्याने आंघोळ करून बाहेर आल्यावर कधी एकदा कपड्यांचे कोट अंगावर चढवतोय, असं होऊन जातं. 

थंडीत दिल्लीतली माणसंही सुंदर दिसायला लागतात, तिथे दिल्लीची काय कथा! नवरात्रीच्या काळात वेगवेगळ्या मंडपांमध्ये फिरण्याची मजाही दिल्लीत याच मोसमात अनुभवायला मिळते. दिवाळीच्या काळात दिल्ली अक्षरश: एखाद्या नव्या नवरीसारखी नटलेली असते.

याच मोसमात दिल्लीत अनेक संगीत महोत्सवांनाही सूर सापडतो. इथे महोत्सव होण्यासाठीच्या जागाही तेवढ्याच रम्य असतात. एखाद्या सुंदर शाळेचं पटांगण, त्यात मांडलेल्या गाद्यागिर्द्या आणि खुर्च्या, मस्त थंडी, ती बाधू नये म्हणून लावलेल्या गॅसबत्त्या, रंगीबेरंगी शाली, स्वेटर, जाकिटं, कोट घालून बसलेला श्रोतृवृंद आणि समोर त्या थंडीतही संगीताचा अनार लावणारे कलाकार... या मैफिलींची मजा काही औरच!

थंडीतच रंगणारा असाच एक महोत्सव म्हणजे जश्न-ए-रेख्ता! हा महोत्सव म्हणजे उर्दू भाषेचा महोत्सव! या भाषेवर, साहित्यावर आणि काव्यावर प्रेम करणारी देशविदेशातील मंडळी 'रेख्ता'च्या मांडवाखाली तीन दिवस जमतात. चर्चा होतात, परिसंवाद होतात, मुशायरे होतात आणि मैफिलीही रंगतात. मोठमोठे उर्दू साहित्यिक, गजलकार, गायक रेख्ताच्या मंचावर येतात आणि त्यांना ऐकण्याची पर्वणी दिल्लीकरांनाच नाही, तर देशभरातल्या लोकांना मिळते.




थंडी सुरू झाली की, आणखी एक मजा असते. आपल्याकडल्या गाड्या काढून (इथे मुंबईत आहेत, त्याच्या चौपट गाड्या आहेत) लोक मुरथल नावाच्या हरयाणामधल्या एका गावात जातात. इथे अनेक ढाबे आहेत. मस्त कुडकुडत्या थंडीत इथल्या ढाब्यांवर जाऊन जेवणाचा आनंद लुटणं, रात्र जागवून पहाटे कॉफी प्यायला घरी येणं, ही मजाही वेगळीच!
पण फक्त मुरथलच नाही, दिल्ली युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी या कँपसवरच्या ढाब्यांमधला तंदुरही थंडीच्या काळात पेटलेला असतो. वाडग्यातल्या भाजी किंवा मटणाएवढ्याच गरमागरम गप्पा टेबलाभोवती बसलेलं कोंडाळं मारत असतं. पंतप्रधानांपासून काँग्रेस अध्यक्षांपर्यंत सगळ्यांच्या रेवड्या उडवल्या जातात. (अर्थात, हे काम कोणत्याही ऋतूत तेवढ्याच हिरहिरीने केलं जातं.)

दिल्लीतला उन्हाळा आता सरत आलाय... पुढल्या महिन्याभरात ऋतू आणखी एकदा कूस बदलेल. सप्तपर्णी घमघमू लागेल, थंडीचे कपडे बाहेर निघतील आणि उन्हाळ्यातलं जडावलेपण झटकून दिल्ली एखाद्या नवयौवनेसारखी तिचं चिरतारूण्य उधळायला लागेल... 

Comments

Popular Posts