RIP ऋषी कपूर


Happy Birthday Rishi Kapoor! Here are the throwback pictures of ...
कालचा दिवस मध्यावर आला होता, तो इरफान खान गेल्याची बातमी घेऊन. रात्री न खळलेल्या आसवांनी चिंब झालेली उशी सकाळपर्यंत सुकतेय, तोच सकाळी ऋषी कपूर गेल्याची बातमी आली. हातातला चहाचा कप बाजूला ठेवून सुन्न बसून राहावंसं वाटलं. किंबहुना त्याशिवाय पर्यायच नव्हता. चॉकलेट हिरो ही संकल्पना आपल्याकडे रूजवणारा, पुढे चित्रपटातल्या आणखी एका हिरोबरोबरचा सह-हिरो आणि त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये वाट्याला आलेल्या काही खलनायकी भूमिकांमधून काळजाचा
ठाव घेणारा अभिनेता या पलीकडे त्याच्याशी खूप जवळचं नातं असल्यासारखं वाटतं. ते नातं त्याच्या जाण्याने संपलं, असं तर नाही म्हणता येत. पण त्या नात्यावर काही पुटं चढली एवढं नक्की.
आमच्या पिढीसाठी ऋषी कपूर म्हणजे खरं तर दोन पिढ्यांमागचा अभिनेता. पण तरीही कपूर खानदानातला, राज कपूरचा मुलगा म्हणून त्याने मनात केव्हाच घर केलं होतं. लहानपणी दिव्या भारती या कमालीच्या सुंदर नटीची चर्चा होती. प्रेम, सौंदर्य वगैरे न कळण्याचं वय होतं. पण तरीही तिच्याकडे बघून खूप छान वाटायचं. ऋषी कदाचित पहिल्यांदा दिसला तो तिच्याबरोबर दिवाना मध्ये. मग केबलवर लागणारे अमर-अकबर-अँथनी, सागर, बॉबी, अजुबा वगैरे चित्रपट बघण्यात आले.
त्या वेळी त्याच्या अभिनयातलं फारसं काही कळायचं नाही. बराच काळ मेरा नाम जोकर हाच त्याचा स्क्रीनवरचा पहिला वावर, असं वाटत होतं. पुढे बाबांबरोबर एकदा श्री-४२० बघत असताना मैं ना रहुंगी, तुम ना रहोगे फिर भी रहेंगी निशानियाँ असं पडद्यावर नर्गिस गाताना तिच्या कटाक्षबरहुकूम दिसणाऱ्या तीन मुलांपैकी रेनकोट घालून चाललेला सगळ्यात छोटा मुलगा म्हणजे ऋषी कपूर, हे लक्षात आलं.

Rishi Kapoor Did Shree 420 role only after a chocolate bribe mppg ...

आता लिहिताना आणखी एक गोष्ट लक्षात येत आहे. ऋषी कपूर ६७व्या वर्षी गेला. पण तरीही ते ऋषी कपूर असं लिहायलाही लेखणी धजावत नाही. त्याच्या चाहत्यांसाठी तो ऋषी कपूरच राहणार. एकेरी उल्लेखच होणार. लोकांना त्याच्याबद्दल जी जवळीक वाटायची, त्याचंच हे द्योतक आहे. देव आनंद नाही का, शेवटपर्यंत तो देव आनंद राहिला!
ऋषी चित्रपटसृष्टीत आला तो कपूर खानदानाचं नाव घेऊन. आजोबा पृथ्वीराज कपूर हे रंगभूमी आणि चित्रपटांमधले दिग्गज अभिनेते. वडिलांनी तर अवघ्या २३-२४व्या वर्षी मुंबईत आपली छाप उमटवणारी मयसृष्टी उभारली आणि शो-मॅन ऑफ द मिलेनिअम अशी ओळखही मिळवली. काका शशी आणि शम्मी हेदेखील अनुक्रमे अभिनय आणि लोकप्रियता यांचे वेगळेच मापदंड निर्माण करणारे! बाहेरून बघणाऱ्या कोणालाही सहज वाटावं की, चित्रपटसृष्टीत आरामत पदार्पण करण्यासाठी आणखी काय हवं!

Rima Jain on parents Krishna and Raj Kapoor: All his life, he was ...

नेमकं इथेच कपूर खानदान थोडंसं वेगळं वाटतं. पृथ्वीराज यांच्यासारखा तोलामोलाचा आणि प्रथितयश बाप असूनही राज यांनी सहाय्यक दिग्दर्शक बनण्यापासून काम सुरू केलं होतं. आर.के. स्टुडिओ उभारला तोसुद्धा स्वत:च्या हिकमतीवर आणि स्वत:ची माणसं गोळा करून. शम्मी आणि शशी यांनीही आर. के.मधून चित्रपटाची कारकीर्द न घडवता आपली वेगळी वाट चोखाळली होती. ऋषीसाठी आर. के.चे दरवाजे खुले असले, तरी प्रसंगी पाठीत रट्टा हाणणारा राज कपूर सारखा दिग्दर्शक समोर होता. सुरुवात झाली, तीसुद्धा सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनच!
त्यात एका वटवृक्षाच्या छत्रछायेत इतर झाडं खुरटतात, हा निसर्ग नियम आहे. ऋषी या नियमाला अपवाद ठरला. राज कपूरच्या छायेतही हे झाड मस्तच फुललं. किंबहुना हेच त्याचं मोठेपण म्हणायला हवं. झाडाचीच उपमा द्यायची, तर ऋषी कपूर हा चाफा आहे. देखणा, मोहक आणि खानदानी!
मेरा नाम जोकर हा राज कपूरच्या नावावरचा फ्लॉप चित्रपट म्हणून ओळखला जातो. पण त्यात ऋषी कपूरने केलेला अभिनय अव्वल नंबरी आहे. आपल्या शाळेतल्या सुंदर दिसणाऱ्या शिक्षिकेबद्दल आकर्षण असणारा राजू तिला आंघोळ करताना बघतो, तेव्हा ऋषी कपूरने चेहऱ्यावर जे भाव दाखवले आहेत, ते निव्वळ नितांतसुंदर आहेत. (आता लोकांनी ऋषीचा चेहरा न बघता सिम्मीचा देह तेवढा बघून आंबट चर्चा केल्या हे लोकांचं आणि राज कपूरचंही दुर्दैव)

Rishi Kapoor's death: Veteran actor made his debut in father's ...

त्यानंतर आला बॉबी. आर. के. स्टुडिओला आणि ऋषी कपूरच्या करिअरला उभारी देणारा चित्रपट. पण यातही ऋषीपेक्षा डिंपलच काकणभर जास्त भाव खाऊन गेली आहे, असं जाणकार म्हणतात. तरीही बॉलिवूडला चॉकलेट बॉय मिळाला, तो याच चित्रपटामुळे!
ऋषी कपूरने त्याच्या आत्मचरित्रात त्याच्या कारकि‍र्दीचा यथासांग आढावा घेतला आहे. बॉबीनंतर त्याने एकट्याने काम केलेले चित्रपट फार चालले नाहीत. खेल खेल में हा सणसणीत अपवाद म्हणायला हवा. पण त्यानंतर लक्षात राहतात ते ऋषी कपूरने इतरांच्या जोडीने केलेले चित्रपट! तो वाईट अभिनेता होता, असं बिलकुलच नाही. पण सचिन तेंडुलकरच्या काळात एकापेक्षा एक भन्नाट इनिंग्ज खेळणाऱ्या राहुल द्रविडचं जे झालं, तेच ऋषी कपूरचं झालं, असं म्हणावं लागेल. त्याच्या सोलो इनिंग्जपेक्षाही त्याने केलेल्या पार्टनरशिप्स जास्त लक्षात राहिल्या.

Amar Akbar Anthony to be remade in Britain - bollywood - Hindustan ...

मग आला मध्यमवयात असूनही आपल्यापेक्षा लहान वयातल्या हिरॉईनसोबत काम करण्याचा कालखंड. दिवाना, बोल राधा बोल, चांदनी वगैरे हे चित्रपट याच काळातले. अभिनयाच्या दृष्टीने हे चित्रपट काही आव्हानात्मक नव्हते. तरीही या सगळ्या चित्रपटांमधला ऋषी लक्षात राहतो.
वैयक्तिक विचाराल, तर मला ऋषीची अलिकडची इनिंग जास्त आवडते. ही इनिंग त्याने स्वत:च्या जोरावर गाजवली. इतर अभिनेतेही होते, पण लक्षात राहिला तो. अशा दोन भूमिका पटकन आठवतात. एक म्हणजे औरंगजेब या चित्रपटात त्याने साकारलेलं पोलीस अधिकाऱ्याचं पात्रं आणि नवीन अग्निपथमध्ये त्याने साकारलेला रौफ लाला! या दोन्ही खलनायकांनी अंगावर काटा आणला होता.
त्या उलट हाऊसफुल या विनोदी चित्रपटांच्या सीरिजमधल्या एका चित्रपटात तो आणि रणधीर कपूर डब्बू आणि चिंटू या त्यांच्या खऱ्या टोपणनावांसह एकमेकांच्या समोर उभे राहिले होते. त्यातला ऋषीचा गेटअप बघून भविष्यात कधीतरी हा माणूस विन्स्टन चर्चिलची भूमिका उत्तम करू शकेल, असंच वाटलं होतं. या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिकाही त्याच्या लक्षात राहिलेल्या भूमिकांपैकीच एक आहे.

I had refused Agneepath: Rishi Kapoor - bollywood - Hindustan Times

ऋषीबद्दल बोलतोय आणि त्याच्या नाचण्याच्या आणि वाद्यं वाजवण्याच्या शैलीचा विषय निघाला नाही, तरच नवल! ‘डफलीवाले डफली बजा... या गाण्यातल्या त्याच्या त्या डफलीची क्रेझ इतकी होती की, त्याआधी आणि त्यानंतरही अनेक गाण्यांमध्ये अनेक अभिनेत्यांच्या हाती डफली बघितली, पण ती ऋषी कपूरच्या हाती जेवढी खुलून दिसली, तेवढी कोणाच्याच हातात दिसली नाही. गिटार असो किंवा ड्रम तो ते वाजवल्याचा अभिनय एवढ्या बेमालूमपणे करायचा की, त्याला ती वाद्यं वाजवता येत नाहीत, हे सांगूनही खरं वाटायचं नाही. तीच गत अमर-अकबर-अँथनीमधल्या शिर्डीवाले साईबाबा किंवा पर्दा है पर्दा या कव्वाल्यांची! त्यातला ऋषीचा अभिनय बघून कोणीही म्हणावं की, हे घराणं अस्सल कव्वालांचंच! हे कदाचित वडिलांकडून आणि काका शम्मी कपूरकडून आलं असावं. तसंच त्याचं नाचणंही. एखादा फिरता रंगमंच आहे, दोन कॉलेजमधली किंवा कॉलेजमध्या दोन ग्रुपमधील दुष्मनी नाचावाटे बाहेर निघत आहे आणि ऋषी कपूर मुक्तपणे नाचतोय, हे दृष्य त्या काळातल्या अनेकांच्या मनावर पक्कं कोरलं गेलं असणार. मिथुन चक्रवर्तीच्या आधी आणि शम्मी कपूरनंतर नाचाला ग्लॅमर मिळवून देण्याचं श्रेय खचितच ऋषी कपूरचंच!

RishiKapoorFanClub on Twitter: "#WednesdayWisdom Rishi Kapoor ji ...

भारतीय समाजाची मानसिकता मोठी मजेशीर आहे. त्यांना एकाच वेळी एकाच गोष्टीचा रागही येत असतो आणि त्या गोष्टीबद्दल मनात कुतुहलमिश्रित कौतुकही असतं. घराणेशाही हीदेखील अशीच एक गोष्ट! घराणेशाही, मग ती राजकारणातली असो, समाजकारणातली असो किंवा मग संगीतातली असो, लोकांना ही कुतुहलमिश्रित, तिरस्काराची आणि कौतुकाची भावना असतेच. बॉलिवूडही याला अपवाद नाही. ऋषीनंतर त्याचा मुलगा रणबीर आता स्वत:चं गलबत हाकतोय, करिना कपूर-खान डोलानं ही पताका पुढे नेतेय. या घराणेशाहीचे जसे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत. तुम्ही केलेली मेहनत डोळ्याआड होते आणि फक्त तुमचं घराणं मोठं होतं, म्हणून तुम्हाला हे यश मिळालं, असे कटू बोल ऐकावे लागतात.
ऋषीनेही हे सगळं ऐकलं. लहानपणापासून वैयक्तिक आयुष्यात आलेली अनेक वादळं पचवली. समाजातल्या प्रश्नांबद्दल ठाम भूमिका घेत लोकांना ऐकायला कडू वाटणारी मतंही रोखठोक ऐकवली. अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट... टाळेबंदी जाहीर झाली होती आणि ऋषी कपूरने ट्वीट करत दारूची दुकानं उघडण्याची मागणी केली होती. दारू मिळाली नाही, तर अनेकांना नैराश्य येईल, असंही तो म्हणाला होता. समाजमाध्यमातील जल्पक त्याच्यावर तुटून पडले होते. अक्षरश: ट्रोलधाड आली होती. काहींनी अत्यंत हिणकस भाषेत त्याची टर उडवली. त्याच्या तापट स्वभावानुसार तो संतापलाही होता. सगळं व्यवस्थित चालू होतं की! मग आज ही बातमी अचानक कशी?
काल इरफान खान गेला. घरचं कोणीतरी गेलंय, असंच वाटत होतं. आज ऋषी कपूर गेला! कालच्या वाटण्याची बोच आणखी टोचायला लागली. शकील बदायुनीचा एक शेर आठवला...
वो उठे हैं ले के ख़ुम--सुबू अरे 'शकील' कहाँ है तू
तेरा जाम लेने को बज़्म में कोई और हाथ बढ़ा दे


Comments

Popular Posts