जानें क्यूँ आज, तेरे नाम पे रोना आया...
आज सकाळी निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी आली. थोड्या वेळाने ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचीही बातमी आली. सुरुवातीला हबकून गेलो, नंतर सावरलो. पण संध्याकाळी थेट हॉस्पिटलचं पत्रकच व्हॉट्सअपवर फिरू लागलं. त्या पत्रकाबरोबरच आठवणींचा एक फेराही मनात फिरू लागला.
सन २००१. रूईया नाट्यवलयला उतरती कळा आली होती. अनेक वर्षांमध्ये रूईयाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपैकी एकही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली नव्हती. एकांकिका स्पर्धांमधील रूईयाचा दबदबा कमी झाला नसला, तरी या कॉलेजच्या नावाभोवती असलेलं वलय धुसर होत होतं.
त्याच वर्षी रूईया महाविद्यालयात मी प्रवेश घेतला होता. शाळेपासून नाटकाची आवड असल्याने, आधी नाटकांमध्ये कामं केली असल्याने नाट्यवलयमध्ये जायचं, हे ठरलं होतं. पावसाळ्याचे दिवस होते. रूईयाच्या मिनी ऑडिटोरिअममध्ये नाटकासाठीच्या ऑडिशन्स होणार होत्या. नवीन नवीन कॉलेजमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे जरा भीती होती, बुजरेपणा होता, पण नाटकातला मेन रोल आपल्यासाठीच लिहिला आहे, असा काहीतरी अवाजवी आत्मविश्वासही होता.
मिनी ऑडिटोरिअममध्ये दोन खुर्च्यांवर एक मुलगा आणि एक मुलगी बसले होते. ते ऑडिशन्स घेणार होते. हेच आपले दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे मी कौतुकभऱ्या नजरेने बघत होतो. त्यांच्या आपसात गप्पा चालू होत्या. ती मुलगी परिचयाची होती. कॉलेजमध्ये सीनिअर होती. पण माझ्या शाळेतल्या मैत्रिणीची बहीण होती. त्यामुळे 'वशिला' भक्कम होता. 'रायगडाला जेव्हा जाग येते' मधला संभाजीचा पार्ट करून मी झोकात गर्दीत जाऊन बसलो. थोड्या वेळाने सगळ्यांच्या ऑडिशन्स झाल्या. त्या दोघांनी निवडलेल्या मुलांची नावं जाहीर केली. माझंही नाव त्यात होतं. बास, आता मेन रोल आणि आपण यात कोणीच नाही, अशा काहीतरी विलक्षण धुंदीत मी घरी आलो.
आठवडाभराने नाटकाच्या तालमी सुरू होणार होत्या. त्या वेळी रूईयाच्या ऑडिटोरियमच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यामुळे ऑडिटोरिअमच्या बाजूलाच असलेल्या लेडिज कॉमन रूममध्ये कॉलेजची वेळ संपली की, आमची तालीम सुरू व्हायची. पहिल्या दिवशी तिथे गेलो. बघितलं, तर त्या दिवशी निवडलेल्या मुलांपैकी काही जण होते आणि काही नवे सीनिअर तिथे आले होते. ऑडिशन घेणारे सरही तिथेच होते. मी त्यांना जाऊन भेटलो आणि पुढे काय, असं विचारलं.
'निशी येईल थोड्या वेळाने, तो सांगेल पुढे काय करायचं.' तो म्हणाला.
'निशी?' हा प्रश्न मी स्वत:लाच विचारला.
काही वेळाने अचानक खोलीत सुरू असलेली कुजबूजही शांत झाली. एक मध्यमवयाचा, म्हणजे साधारण तिशीचा माणूस आत आला. पायात साध्या सपातांसारख्या चपला, टीशर्ट, थ्री-फोर्थ पँट, विस्कटलेले कुरळे केस, गालांवर दाढीचे खुंट, झोप न झाल्यासारखे जाबडलेले डोळे, हाताता मार्लबोरो लाईट्सची दोन पाकीटं, अशा अवतारात आलेल्या त्या माणसाला बघूनच दडपण आलं होतं. तो निशिकांत कामत होता!
त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यातील नाटकाची एक शाळा सुरू झाली. एकांकिका जेमतेम ३५ ते ४० मिनिटांची होती. अदिती सारंगधर, मनवा नाईक, अमृता संत, संतोष वेरूळकर, शिवदर्शन साबळे, प्रताप फड असे आज मनोरंजन क्षेत्रात चमकणारे एकापेक्षा एक सरस कलाकार एकांकिकेत होते. त्यामुळे आमची जागा मॉबमध्ये, हे नव्याने सांगायलाच नको. पण ते मॉबमध्ये असणंही खूप काही शिकवून जाणारं होतं. कॉलेजची एकांकिका म्हणजे अगदी शिस्तीचं काम होतं. खुर्च्या कोणी उचलायच्या, ठोकळे कोणी कुठे ठेवायचे, याची साग्रसंगीत तालीम व्हायची.
निशी सर खूप कमी बोलायचे. बोलले, तरी अत्यंत हळू आवाजात काहीतरी पुटपुटल्यासारखं सांगायचे. उजव्या हाताच्या दोन बोटांमध्ये सिगारेट कायम असायची. मार्लबोरो लाईट्स हा ब्रँड त्या वेळी जो डोक्यात घट्टं बसला, तो अजूनही निघायला तयार नाही. (फक्त डोक्यातच घट्ट बसला. ओठांमध्ये काही आला नाही.) येरझारा घालत असायचे. अगदी स्टेजवर एखादा सीन सुरू असेल, तरी एक नजर तिथे ठेवून चकरा मारण्याचं काम सुरू असायचं. डोक्यात काहीतरी शिजत असायचं. मग अचानक फेऱ्या घालणं थांबायचं. त्यांचं फेऱ्या मारणं थांबलं की, सीनही आपोआप थांबायचा. निशी सर अदितीला किंवा मनवाला किंवा शिवदर्शन साबळेला जवळ बोलावून काहीतरी सांगायचे. सीन पुन्हा सुरू व्हायचा.
त्या नाटकाच्या शेवटी अदितीचा एक लांबलचक दीर्घ श्वासात म्हणण्यासारखा एक डायलॉग होता, 'MPD... Multipal Personality Disorder, A Thesis by mr. John Clerk... First edition 1986... from 1986 to 2001 one thousand six hundred and 44 confirmed cases of multipal personality disorder all around the world...' मग अदिती श्वास घेऊन पुढला डायलॉक अगदी थंडपणे म्हणायची. 'तुम्ही एक गोष्ट विसरलात प्रणव साहेब, मी तीन वर्षं लायब्ररियन म्हणून काम केलं.' ही शेवटची ओळ निशी सरांच्या तोंडून ऐकताना सर्रकन काटा यायचा.
दिग्दर्शक म्हणून हा माणूस किती मोठा आहे, त्याची चुणूक त्याच वेळी आली होती. नाटक कसं बांधायचं, त्या ३५ मिनिटांच्या अवकाशात योग्य ठिकाणी धक्का तंत्र कसं वापरायचं, नाटकात संगीताचा-प्रकाशयोजनेचा वापर करून नेमका परिणाम कसा साधायचा, हे बघणं थक्कं करणारं होतं. शैलेंद्र बर्वे आणि स्वप्निल नाचणे या दोघांनी नाटकाचं संगीत केलं होतं. संगीत कसलं, तो बॅकग्राऊंड स्कोअरच होता. निशी त्यांनाही काही ना काही मध्ये सांगायचे.
हे सगळं त्या लेडिज कॉमन रूमच्या एका कोपऱ्यात बसून बघताना हरखून जायला व्हायचं. आम्ही मॉबमध्ये होतो. त्यामुळे निशी सरांशी थेट बोलणं खूप कमी व्हायचं. पण एकदाच मला आठवतं, आम्ही काहीतरी भंकस करत होतो. निशी सर त्या वेळी तिथे नव्हते. पण ते कधी आले, आम्हाला कळलं नाही. मी काहीतरी आगाऊपणा करून कोणाची तरी नक्कल करत होतो. ते आले आणि त्यांनी एक थंड नजर टाकून हसत माझ्याकडे बघितलं. मी जागच्या जागी थिजलो होतो. त्यांच्या नेहमीच्या पुटपुटणाऱ्या आवाजात त्यांनी मला विचारलं, 'काय रे, Acting सिरिअसली करायची आहे का?' मी कसंबसं 'हो' एवढंच उत्तर दिलं. पुन्हा हसून ते पुढे गेले. त्यापुढे तालमीच्या वेळी, निदान निशी सरांच्या तालमीच्या वेळी भंकस करणं बंद.
त्या एकांकिकेतले अनेक सीन निशी सरांनी रात्र-रात्र थांबून अदिती, मनवा, शिबू (शिवदर्शन साबळे), संतोष वेरूळकर यांच्याकडून बसवून घेतले होते. आम्ही क्वचितच साडेआठ-नऊच्या पुढे थांबायचो. पण थांबलो की, या चांगल्या चांगल्या कलाकारांचा घामट्या निशी सर कसा काढतात आणि ते कलाकारही किती मेहनतीने दिग्दर्शकाला जे काही हवं, ते देण्याचा प्रयत्न करतात, हे बघणं खरंच खूप काही शिकवणारं होतं.
१५ ऑक्टोबर २००१ ला INT ची अंतिम फेरी साहित्य संघ मंदिरात होती. तारीख अचूक लक्षात असण्याचं कारण, माझा वाढदिवस होता. रात्री उशिरापर्यंत एकांकिका सुरू होत्या. निकालाची वेळ आली. परफॉर्मन्स मस्तच झाला होता. मुख्य म्हणजे मॉबमध्ये असलेल्या आम्हीही आमची कामं चोख केली होती. बक्षिसं जाहीर व्हायला सुरुवात झाली आणि त्या रात्री रूईयाच्या पारड्यात असलेला बक्षिसांचा दुष्काळ साफ धुवून निघाला. रूईयाने INT चा चषक जिंकला होता. कोणीतरी माझ्या वाढदिवसाचं गिफ्टच मला दिलंय, असं वाटत होतं.
त्या स्पर्धेनंतर मी त्या एकांकिकेत काम करू शकलो नाही. पण निशी सर कधीही भेटले की, हसायचे. एखाद दोन वाक्यं बोलणंही व्हायचं. पुढे पत्रकारितेत आलो. मटामध्ये असताना मटा सन्मानच्या वेळी त्यांची पुन्हा भेट झाली. तोपर्यंत डोंबिवली फास्ट, मुंबई मेरी जान वगैरे चित्रपट आले होते. आमच्या रूईयाच्या या दिग्दर्शकाची दखल बॉलिवुडनेही घेतली होती. पण तरीही मला बघितल्यानंतर त्यांनी 'काय रे, कसा आहेस?' असं विचारलं होतं. त्यांना माझं नाव अर्थातच लक्षात नव्हतं. त्यांनी ते ठेवावं अशी अपेक्षाही नव्हती. तरीही कधी काळी आपल्या एकांकिकेत या पोरानं काम केलं होतं, याची नोंद त्यांनी ठेवली होती.
त्यानंतरही दोन-तीन वेळा भेट झाली होती. बोलणं झालं होतं. एखाद्या सीनिअरने खांद्यावर हात ठेवून काहीतरी समजुतीच्या किंवा महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्यात, तशा पद्धतीचं त्यांचं बोलणं होतं.
पुढे मनोरंजन क्षेत्राशी असलेला संबंध कमी झाला. पत्रकारितेत वेगळ्या क्षेत्रात बातमीदारी करायला लागलो. निशी सरांशीही त्यानंतर बोलणं झालं नाही.
काही दिवसांपूर्वी ते खूप आजारी आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर आहेत, हे कळलं. रूईयातल्या त्या वेळच्या काही लोकांना लगेच विचारलं, तर त्यांनीही त्या बातमीची पुष्टी केली. निशी सर बरे होतील, ते बरे झाल्यानंतर त्यांना नक्की फोन करून चौकशी करू, असं मनाशी ठरवलं होतं. आता कसला फोन आणि कुठली चौकशी?
- रोहन टिल्लू
Comments
Post a Comment