घरमालकास (पुन्हां एकदा) मानपत्र!
आदरणीय मालक यांस कृतानेक साष्टांग नमस्कार,
ईमेल, रेडिओ लहरी, पॉडकास्ट, युट्युब, फेसबुक लाईव्ह आदी तंत्रस्नेही युगातही हे छापील मानपत्र तुम्हाला अर्पण करण्याच्या आमच्या या कृत्यास तुम्ही काहीही म्हणालात, तरी ते ऐकून घेण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण मालकांनी बोलावे आणि आम्ही ऐकावे, हे धोरण ही चाळ उभी राहण्याच्या आधीपासूनच सुरू आहे.
आमचे आजोबा, नारूकाकांचे वडील, वगैरेंनी चाळ उभी राहण्याआधीच त्यांच्या आयुष्याची जमापूंजी आपल्याच सावत्र भावाकडे जमा केली होती ना! त्या वेळी थोरल्या मालकांनी दिलेल्या आश्वासनांपुढे त्या वेळचे पुढारीही लाजले होते, असं म्हणतात. पण काहीही का असे ना, थोरल्या मालकांनी चाळसदृश काहीतरी उभं केलं आणि तुमच्या घराचे आणि आमचे ऋणानुबंध (थकलेलं भाडं हे ऋणच म्हणायला हवं ना) सुरू झाले.
मालक, तुमच्याशी काय खोटं बोलणार! तुमच्या सावत्र भावाने, म्हणजे थोरल्या मालकांनी चाळीची बजबजपुरी करून सोडली होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या 'माणसा'बरोबर तुम्ही भाडं वसूल करण्याच्या निमित्ताने संपूर्ण चाळ फिरलात आणि पहिल्या मजल्यावरच्या नारूकाकांच्या खोलीसमोरच बसकण मारून 'या चाळीचं भाग्य उजळून टाकल्याखेरीज मी राहणार नाही' असं तुम्हीच म्हणाला होतात!
आता याची आठवण आम्ही तुम्हाला काय करून द्यायची म्हणा! स्मरणशक्तीच्या बाबतीत तुमचा हात धरणारं आपल्याच चाळीत काय, पण आसपासच्या चाळींमध्ये आणि सोसायट्यांमध्येही कोणीच नाही. खासकरून थोरल्या मालकांच्या आमदनीत चाळीच्या कोणत्या मजल्यावरची कितवी पायरी निसटली इथपासून ते शेजारच्या चाळीला खेटून असलेलं कुंपण बांधताना मोठ्या मालकांच्या मधल्या पोराने किती पैसे मधल्यामध्ये लाटले आणि त्यामुळे त्या वर्षी शिमग्याच्या वेळी शेजारच्या चाळीतल्यांनी फेकलेल्या फुग्यांमुळे आपल्या चाळीच्या भिंती कशा खराब झाल्या, सार्वजनिक संडासातील टमरेलांचा गैरव्यवहार, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरच्या जिन्यातल्या बल्ब खरेदीत झालेला घोटाळा असे अनेक तपशील आपल्याला मुखोद्गत आहेत.
तर मालक, त्या दिवशी तुम्ही चाळीच्या कल्याणापोटी फोडलेल्या हंबरड्याने आम्हा चाळकऱ्यांची मनं जिंकलीत. 'मी तुमचा मालक नाही, मी तर फक्त सेवक. खरे मालक तुम्ही' हे तुमचं वाक्यं ऐकल्यानंतर पंडितअण्णांना घेरी येता येता राहिली होती. इतकी वर्षं या चाळ नावाच्या उभ्या झोपडपट्टीत काढलेल्या आयुष्याचं चीज झालं, असंच वाटलं होतं.
मालक, त्या वेळी तुम्ही आम्हाला साक्षात् नेपोलियनसारखे भासत होतात. तुमच्याच सावत्र भावाला माफी नाही, हे तुमच्या तोंडून ऐकताना आम्हाला आम्ही 'रामशास्त्री प्रभुणें'च्या अवताराला तर भेटत नाही ना, असं वाटत होतं. 'मी मालक झालो की, जळाऊ सरपण आसपासच्या चाळींमध्ये मिळतं त्यापेक्षा स्वस्तात देईन' ही त्या वेळची तुमची घोषणा अजूनही या कानांमध्ये दुमदुमते आहे.
मालक, तुम्हाला आठवतं का? तळ मजल्यावरच्या दोन मारवाड्यांनी थोरल्या मालकांना हाताशी धरून अर्धा मजला बळकावला होता. थोरले मालक मारवाड्यांचे हस्तक आहेत, अशी आवई तुम्ही उठवली होती. 'या दोन मारवाड्यांना वठणीवर आणेन, तरच बापाचं नाव लावेन', असा दिलासा आपल्या खोल्या विकून दूर बदलापूर-आसनगाव वगैरेला राहायला गेलेल्या चाळकऱ्यांना तुम्हीच ना फोन करून दिला होतात! तुम्ही मालक झाल्यानंतर या बदमाश मारवाड्यांच्या घरात लपवलेले तांदुळ-गहू भाडेकरूंना वाटण्याचं आश्वासनही तुमचंच होतं ना! गेल्याच महिन्यात शा. चापशीने पहिल्या मजल्यावरच्या आणखी दोन खोल्या विकत घेतल्या, बरं का!
मालक, तुम्ही आमच्यासाठी एवढं करणार होतात म्हणून आम्ही चाळकरीही एक शिष्टमंडळ घेऊन थोरल्या मालकांना भेटलो. एवढी वर्षं भाडं घेऊनही चाळीची ही अवस्था का, असं आम्हीही त्यांना ठणकावून विचारलं. तिंबुनानांनी तर चाळीच्या चौकात ठिय्या आंदोलन केलं. आमच्या या सगळ्या कारवायांना तुमचाच पाठिंबा होता ना!
अखेर तुमच्या आणि त्या वेळी आमच्याही मनासारखं झालं. थोरल्या मालकांनी अखेर चाळीचा हक्क सोडला आणि कागदपत्रं तुमच्या नावे केली. आम्ही समस्त चाळकऱ्यांनी तो दिवस अक्षरश: दसरा-दिवाळीसारखा साजरा केला होता. मालक झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा चाळीत आलात, तेव्हाचा सोहळा आठवतो ना? आमचं कुटुंब, नारूकाकांची सून, तळमजल्यावरच्या मालतीबाई, राहिलंच तर मारवाड्याचं कुटुंबं, एवढंच कशाला, जवळपास प्रत्येक बिऱ्हाडातल्या सुवासिनींनी कुंकुमतिलक लावून ओवाळून तुमचं स्वागत केलं होतं. चाळीची पहिली पायरी चढताना तुम्ही सद्गदीत होतसे चपला काढून चाळीच्या उंबऱ्याच्या पाया पडला होतात. ते दृश्यं बघून समस्त चाळीचे डोळे पाणावले होते.
हा झाला मोठा प्रसंग! पण अगदी छोट्या गोष्टीचा मोठा सोहळा कसा करावा, हे तुमच्याकडूनच शिकावं. थोरल्या मालकांच्या काळात ते वर्षातून फार तर एकदा वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी चाळीत येऊन भाषण करायचे. पण तुम्ही तर दर महिन्यात एकदा चाळकऱ्यांसमोर भाषण करू लागलात. मालक झाल्यानंतर तुमच्यावरल्या जबाबदाऱ्या वाढल्या. मग तुम्ही चाळीचा कारभार 'माणसा'च्या हाती दिलात. चाळीत सगळं 'आलबेल' सुरू आहे ना, याची खातरजमा करण्यासाठी गुरखे नेमलेत. आणि तुम्ही स्वत: आसपासच्या सोसायट्यांमध्ये दौरे करते झालात.
मालक, तुम्ही मालक झालात आणि सर्वात आधी सगळ्या भाडेकरूंच्या सुरुवातीपासूनच्या भाडेपावत्या तपासण्याचा फतवा काढलात. तुमच्या त्या फतव्याने अनेकांचं कंबरडं मोडलं. तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंना ऐन पावसाळ्यात वर्षासहलीचा अनुभव मिळावा, म्हणून थोरल्या मालकांनी छपराची डागडुजी केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या अनेक भाडेपावत्या भिजून सडल्या होत्या. काहींच्या पावत्यांना वाळवी लागली होती. पण 'पावती नसेल, तर खोली खाली करा', हा आपला हुकूम ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. तळमजल्यावरच्या हसन मुलाण्याने त्या धास्तीने चाळ सोडली. वास्तविक चाळ बांधताना हसनच्या आजोबांनी थोरल्या मालकांना अगदी घमेली वाहण्यापासून मदत केली होती. ही गोष्ट मालक तुम्हालाही माहीत होतीच ना! पण तरीही तुम्ही अविचल राहिलात.
हा फतवा मागे घ्या, असं विनवायला आम्ही तुमच्याकडे आलो, तर तुम्ही थोरल्या मालकांप्रमाणेच थोरामोठ्यांची वचनं आमच्या तोंडावर फेकलीत की हो! 'कर नाही त्याला डर कशाला', असं म्हणत तुम्ही तुमच्यासमोर पसरलेले आमचे कर हातात घेऊन आम्हाला चालतं केलं होतं!
स्वच्छतेबद्दलचा तुमचा आग्रह तर काय वर्णावा! चाळीला घुशींचा उपद्रव आहे आणि या घुशी चाळी पोखरत आहेत, हे थोरल्या मालकांच्या आमदनीपासूनच तुमचं म्हणणं होतं. या घुशींना हुसकावून लावण्याचंही तुम्ही कबूल केलं होतं. एक दिवस तुम्ही अचानक चाळीत आलात आणि घरोघरी साठवलेलं धान्य फेकून द्या, असा फतवा काढून मोकळे झालात. धान्य साठवल्याने घुशी लागल्या आहेत आणि हे धान्य फेकून दिल्याने घुशींचा नायनाट होईल, हे आपलं तर्कट तुमच्यावरच्या विश्वासापोटी आम्ही मुग गिळतात तसं गिळलं.
मालक, मोठ्या मेहनतीने जमवलेलं धान्य आम्ही टाकून की हो दिलं. आणि दुसऱ्या दिवशी चाळीतल्याच मारवाड्याच्या दुकानासमोर गरजेपुरतं धान्य विकत घेण्यासाठी मुकाटपणे रांगेतही उभे राहिलो. मालक, त्या दिवसानंतर आजपर्यंत घरातल्या कणग्या धान्याने भरल्या नाहीत, पण घुशी मात्र आमच्या अंथरूणातही बागडत आहेत.
मालक, तुम्हीच म्हणाला होतात ना, की या चाळीच्या जागी मला अशी चाळ उभारायची आहे जिचा जग हेवा करेल! पण प्रत्यक्षात मात्र चाळीच्या चौकात असलेल्या एका दगडाभोवती तुम्ही मंदिर उभारलंत आणि म्हाताऱ्या बायकांच्या दुपारच्या वेळेची सोय केलीत.
मालक, या मानपत्रातून तुमच्या कर्तृत्त्ववान पोरांनाही दंडवत! चाळीत खेळण्याच्या बहाण्याने येऊन आमच्या पोरांमध्ये भांडणं लावून जाण्याचं त्यांचं कसब वकिलांनाही लाजवेल असं आहे. चाळीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही ठेवलेले राखणदार, तुमचा 'माणूस', चाळीतही तुमच्या कर्तृत्त्वाचे गोडवे गाण्यासाठी तैनात असलेले तुमचे खुशमस्करे अशा सगळ्यांनाच या मानपत्रातून साष्टांग नमस्कार!
मानपत्राच्या शेवटी काहीतरी मागणे असते. तुम्ही काहीतरी देणार म्हटल्यावर आमच्या छातीत धडकी भरते. त्यामुळे काहीही मागणं न मागता फक्त एकच विनंती! तुम्ही घडवून आणत असलेल्या 'सुधारणां'ना तोंड देत आम्ही कसेबसे आपापल्या खोल्या टिकवण्याच्या प्रयत्नात आहोत. या चाळीच्या जागी तुम्ही जी कोणती चाळ उभाराल, तिची रंग'सफेदी'च करा!
तुमच्यावर कधीकाळी विश्वास असलेले,
तुमचे भाडेकरू
Comments
Post a Comment