मनाला तरुण करणारी संध्याकाळ...

 एखादी संध्याकाळ तुम्हाला आहात त्यापेक्षा जास्त तरुण करून जाते. बर्लिनमध्ये आज तशीच संध्याकाळ गवसली. निमित्त होतं एका जत्रेचं आणि त्या जत्रेत मला सहभागी करून घेतलेल्या माझ्या Classmates चं...




सध्या बर्लिनला ख्रिसमसचा ज्वर चढलाय. थंडीचा जोर वाढू लागला की मला वाटतं, प्रत्येक जर्मन माणसाच्या नाकात वाईनची फोडणी दिलेल्या केकचा गंध रुंजी घालायला लागत असावा. अजून येशूजन्माला तब्बल एक महिना बाकी आहे, पण बर्लिनमध्ये ख्रिसमसचे रंग दिसायला सुरुवात झाली आहे.


रस्त्यातून चालता चालता सहज बाजूच्या इमारतीत एखाद्या गॅलरीत आपण दिवाळीत लावतो, तशा दिव्यांच्या माळा दिसतात. फरक एवढाच की, या माळा बहुतकरून हिरव्या-लाल-निळ्या दिव्यांच्या असतात. शनिवार किंवा रविवारी सकाळी तर हमखास जर्मन कुटुंबातले सगळे सदस्य ख्रिसमस-ट्री सजवताना किंवा त्याची तयारी करताना दिसतात.

मॉल्स आणि दुकानंही ख्रिसमसच्या तयारीने सजली आहेत. अनेक बागांमध्येही छोटेखानी कोपऱ्यांत ख्रिसमससाठी लायटिंग केलंय. शॉपिंग मॉल्समध्ये सँटाक्लॉजच्या आकाराची चॉकलेटं विकायला आली आहेत. खास ख्रिसमससाठी बनवली जाणारी ग्लू-वाईनही विकली जात आहे. त्यामुळे आपल्याकडे दिवाळीच्या आठवडा-दोन आठवडे आधी जसं वातावरण असतं, तसंच इथे जाणवतंय.

यातलाच महत्त्वाचा भाग म्हणजे ख्रिसमस मार्केट्स! इतर जर्मनीतलं माहीत नाही, पण बर्लिनमध्ये प्रत्येक एरियात एक ख्रिसमस मार्केट सजलंय. आपल्याकडे जशा ग्राहक पेठा लागतात, त्याचीच ही अति-सुधारित आवृत्ती! फक्त आपल्या ग्राहक पेठांमध्ये कलाकुसरीवर आणि कपड्यांवर जास्त भर, तर इथल्या ख्रिसमस मार्केटमध्ये खाण्यावर आणि त्याही पेक्षा पिण्यावर जास्त फोकस!

वातावरणात ख्रिसमस असला, तरी युनिव्हर्सिटीत पहिल्या सेमिस्टरच्या प्रोजेक्टसची लगबगही सुरू असते. त्यात काही प्रोजेक्ट ग्रुपमध्ये करायचे असल्याने आमच्या कोर्सची मंडळी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागली गेली आहेत. त्यातल्याच एका ग्रुपमधल्या मंडळींनी मेसेज टाकला, 'शनिवार संध्याकाळ, शार्लोटनबुर्ग ख्रिसमस मार्केट!'

युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांमधून आलेली ही मंडळी खरं तर माझ्यापेक्षा चांगली १२-१३ वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत पार्टी किंवा अशा प्रकारच्या आउटिंगला जाताना मलाच थोडंसं अवघडल्यासारखं होतं. पण सगळेच मनमिळाऊ आणि मुख्य म्हणजे मला अॅडजस्ट करून घेणारे असल्याने या वेळी धाडस करून शार्लोटनबुर्ग गाठलं आणि ही संध्याकाळ न चुकवल्याबद्दल स्वत:चेच आभार मानले.

शार्लोटनबुर्ग हा बर्लिनमधला हायक्लास भाग मानतात. इथे एक श्लॉस Schloss, म्हणजे वाडा किंवा महालही आहे. या महालाच्या प्रांगणातच शार्लोटनबुर्गचं ख्रिसमस मार्केट दर वर्षी भरतं. अगदी खास जुन्या काळातल्या किंवा Fiddler on The Roof चित्रपटातल्या गावाची आठवण करून देणाऱ्या लाकडी झोपड्या, लाकडी मनोरे यांचा आधार घेऊन हे मार्केट भरलंय. त्यातच काही देखावेदेखील उभारले आहेत. प्रत्येक लाकडी खोपटात काही ना काही विकण्याचे पदार्थ किंवा वस्तू ठेवल्या आहेत. पण या ख्रिसमस मार्केटमधलं मुख्य आकर्षण म्हणजे ग्लू-वाईन #glühwein इंग्रजीत या वाईनला Mulled Wine म्हणतात.


 

आपल्या भारतीय लोकांना वाईन हा द्रवपदार्थ फार उमगलाच नाही. निसर्गाशी एकरूप असणारं वाईनएवढं दुसरं उत्तेजक द्रव्य नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. वाईन ज्या द्राक्षापासून बनते, त्या द्राक्षाचा स्वाद घेऊन येते. त्या ओघाने ती द्राक्ष ज्या जमिनीतील आहेत, त्या जमिनीचे अंशही त्या वाईनमध्ये असतात. युरोपमध्ये तर विविध प्रकारच्या वाईन मिळतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे खास ख्रिसमसच्या काळात बनणारी ग्लू-वाईन.

साधारणपणे वाईन हा रूम-टेंपरेचर किंवा थंड करून प्यायचा प्रकार आहे. पण ही ग्लू-वाईन गरमागरमच पितात. ती गरम करणारी विशिष्ट भांडी असतात. तर, ही गरमागरम वाईन हे या ख्रिसमस मार्केटचं वैशिष्ट्य! चवीला ही वाईन काहीशी आंबट असते. पण भेजेशरीफवर चांगला लत्ताप्रहार करण्याची ताकद एका छोट्याश्या कपमध्येही असते.

गेल्या गेल्या आमच्या कोर्समधली मंडळी भेटली. मॅगडा चेक रिपब्लिकमधील मुलगी, बाया नावाची फ्रेंच मुलगी, किम स्वित्झर्लंडची आणि ख्रिश्चन दक्षिण जर्मनीतील फ्रायबुर्ग शहराजवळचा, असा छोटासाच ग्रुप होता. प्रत्येकाच्या हातात ग्लू-वाईनचा कप होता. त्या कपांना माझा कप लावून चिअर्स झालं आणि गप्पा सुरू झाल्या.

ही मुलं वयाच्या मानाने किती प्रगल्भ आहेत, याचं प्रत्यंतर त्यांच्याशी बोलताना सहज येतं. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नाही. ख्रिश्चन जर्मन आहे, पण तो नाझी कालखंडाबद्दलही अगदी सहज आणि मनमोकळेपणे बोलत होता. मी ही गोष्ट बैरूतमध्येही बघितली होती. आपल्याकडे ज्या वयात मुलं 'आता पुढे काय' हा विचार करायला सुरुवात करतात, त्या वयात इथे मुलांनी एक-दोन नोकऱ्या करून पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली असते. कदाचित हा जडणघडणीचा आणि Exposure चा भाग असावा. इथली संस्कृती खूप मोकळी आहे. ती मुलांना कमावतं होईपर्यंत पंखांखाली ठेवत नाही. त्यामुळे १५-१६ वर्षांची झाली की, मुलं आपापल्या पायांवर उभं राहण्यासाठी धडपडतात. काम करून पैसे साठवतात आणि त्यातून पुढल्या शिक्षणाचा खर्च भागवतात. अर्थात पालक पाठीशी असतातच, पण 'तू १३ देख' हे इकडचं तत्त्वं आहे.


 

त्यामुळेच इथल्या मुलांना स्वत:चा असा दृष्टिकोन असतो. तो अनेकदा अनुभवांमधून आलेला असतो. इतरांचे मुद्दे, इतर संस्कृती, समोरच्याचं विसंगत वागणंही आहे तसं स्वीकारण्याचा खुलेपणा बहुधा त्यांच्यात तसाच रूजत असावा. मी त्यांच्यापेक्षा वयाने बराच मोठा, पण तरीही मलाही त्यांनी त्यांच्या गप्पांमध्ये सहज सामावून घेतलं. आता इथे आत्मस्तुतीचा प्रमाद स्वीकारून एक गोष्ट मान्य केली पाहिजे. तुम्हीदेखील तेवढ्याच मोकळेपणे त्यांना सामोरं जायला लागतं. वयानुरुप उत्साहावर चढणारी बुरशीची पुटं झटकून मनाची कवाडं सगळ्या विषयांसाठी खुली करून तुम्हाला त्यांच्याशी बोलता यायला हवं.

तोच प्रयत्न करत मी त्यांच्याशी बोलत होतो. बोलण्याचे विषयांमधलं वैविध्य तर थक्क करणारं होतं. भारतीय राजकारण, आपल्याकडलं भाषावैविध्य, चेक रिपब्लिकमधल्या एखाद्या शहरातील निशाजीवन, ग्लू-वाईन आणि इतर दारूचे प्रकार, सध्या इकडच्या क्लब्समध्ये चालणारी फॅशन, गे-क्लब्ज्, समोरच्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या गे-वाईब्ज, ते अगदी पार सेक्स-टॉईजपर्यंत वाट्टेल ते होते. काही बाबतींमध्ये वय जास्त असूनही आपण किती भोटम् आहोत, हे जाणवत होतं. अशा वेळी श्रवणभक्ती करणं योग्य असतं, हा धडाही तुम्ही आपला आपणच शिकता.

मला सर्वात जास्त काही आवडलं असेल, तर या पोरांची ऊर्जा! मध्येच काही म्युझिशिअन्स लाईव्ह परफॉर्म करायला लागायचे आणि या पोरांची पावलं थिरकायला सुरुवात व्हायची. आपल्याकडे आता स्त्री-पुरुषांमध्ये बराच शारीरिक मोकळेपणा आला आहे. इथे तर तो आधीपासूनच आहे. त्यामुळे एकमेकांना टाळ्या देणं, खांद्यावर हात टाकणं किंवा अगदी कमरेत हात घालून नाचणं हे त्यांना सहज साध्य होतं. ते बघतानाही खूप मस्त वाटतं. नाचाचा गंध नसूनही त्यांच्यासोबत दोन पावलं टाकावीशी वाटतात.


 

या पोरांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यांना खाण्याची शुद्ध नव्हती. पण मला भूक लागली आणि मी जत्रेत खाण्याचे स्टॉल्स शोधत हिंडायला लागलो. आतापर्यंत जर्मनीत टर्कीश किंवा अरेबिक फुड खाण्याचीच वेळ जास्त आली होती. अस्सल जर्मन लोकही ड्यॉनर किंवा केबाब किंवा शॉर्मा खात दुपारची वेळ ढकलतात. त्यामुळे इथे या ख्रिसमस मार्केटमध्ये काही जर्मन मिळतंय का, ते शोधत फिरत असताना Krakauer नावाचा पदार्थ गवसला. हे साधारण हॉट-डॉगसारखं असतं. दाबेलीला वापरतात तशा पावात टाकून ते देतात. त्यासोबत सॉस घेऊन ते चेपलं आणि पुन्हा गप्पांमध्ये सामील झालो.

ख्रिश्चन आणि इतरांचे पुढचे प्लॅन ठरत होते. तिथून ते एका क्लबला जाणार होते. मी पडत्या फळाची आज्ञा घेत तिथून निघालो. पण निघालो, तेव्हा उत्साहाने काठोकाठ भरलो होतो. जर्मनच नाही, तर युरोपमधल्या आणखी तीन देशांमधील संस्कृतीचा थोडासा अंश माझ्यात झिरपला होता. 

Comments

  1. अतिशय सुरेख आणि चित्रदर्शी... बर्लिनमधेच आहोत, असं वाचताना वाटत होते . N_joy...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर... तुम्ही वाचलंत आणि आवर्जून प्रतिक्रिया दिलीत... खरंच खूप बरं वाटलं.

      Delete

Post a Comment

Popular Posts