एका लाजिरवाण्या इतिहासाचं स्मारक!



दुसऱ्या महायुद्धाचं नाव काढलं, तरी जर्मन लोकांची मान शरमेने खाली जाते. पराभव झाला, म्हणून नाही, तर नाझी राजवटीत वांशिक श्रेष्ठतेच्या भ्रामक आणि खुळचट कल्पनांमधून एका मोठ्या समुदायावर झालेल्या अत्याचारांच्या आठवणीने... आजची भेट अशाच एका स्मारकाला!

आपलाच धर्म, वंश, जात, वर्ण श्रेष्ठ आणि इतर लोक जगण्याच्याही लायकीचे नाहीत, अशी समजूत करून घेतलेले लोक जेव्हा राजकारणात उच्च पदावर येतात तेव्हा काय अनर्थ घडतो, याचा धडा सुमारे ९० वर्षांपूर्वी जर्मनीने घेतला. या राजवटीने केलेल्या कृत्यांबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही जर्मनीची मान खाली जाते. कदाचित म्हणूनच आज जर्मनी हा देश सर्वसमावेशक झाला आहे. त्यातही बर्लिन अग्रेसर आहे.

बर्लिनमध्ये फिरताना इतिहासाच्या पाउलखुणा जागोजागी दिसतात, असं मी मागेही म्हटलं होतं. मी राहतो, तो भाग मोआबिट (Moabit) म्हणून ओळखला जातो. टुर्मस्ट्रासं, हान्झाप्लाट्झ (Turmstrasse, Hanzaplatz) वगैरे मेट्रो स्टेशनं याच परिसरात आहेत. या भागात राहायला आलो त्याला अगदी दोन दिवसच झाले होते. सामान खरेदीसाठी बाहेर पडलो आणि चालता चालता थबकलो. एके ठिकाणी रस्त्यात मेणबत्त्या लावल्या होत्या. जवळ जाऊन बघितलं, तर त्या मेणबत्त्यांसमोर रस्त्यातच पितळेच्या (किंवा तांबं... चुभूद्याघ्या) छोट्या चौकोनी आकाराच्या लाद्या बसवल्या होत्या. त्यावर "इथे अमुक अमुक व्यक्ती राहायची. तिचा जन्म अमुक अमुक साली झाला. या-या दिवशी त्या व्यक्तीला अमुक अमुक छळछावणीत पाठवलं आणि तिथे तिचा मृत्यू झाला", असा मजकूर जर्मन भाषेत कोरला होता.




ते वाचून गलबलायला झालं. नंतर पुढे अनेक ठिकाणी या अशाच छोट्या छोट्या लाद्या दिसल्या. टुर्मस्ट्रासं स्टेशनच्या जवळ तर आल्ट-मोआबेट भागाचा नकाशा लावला आहे. त्या नकाश्यावर छळछावणीत नेलेल्या ज्यू लोकांच्या घराची ठिकाणं दाखवली आहेत. प्रत्येक घरावर नंबर आहे आणि बाजूला लावलेल्या कागदांवर त्या नंबरच्या घरात कोण राहायचं आणि त्यांना कुठे नेलं, याची यादीच आहे.



नाझी जर्मनीत ज्यू लोकांवर झालेले अत्याचार, वंशश्रेष्ठत्वाच्या खुळचट आणि रानटी कल्पनेमुळे घडलेला नरसंहार याबद्दल इतिहासाचा एक विद्यार्थी म्हणून चांगलीच माहिती होती. Life is Beautiful, Schindler's List वगैरे चित्रपटांमधून त्या छळछावण्यांचं दर्शनही घडलं होतं. पण गेल्या खेपेला ब्राण्डेनबुर्गर टोअरच्या परिसरात फिरताना एका स्मारकापाशी थबकलो होतो. वेळ नसल्याने त्या वेळी आत जाता आलं नव्हतं. पण आज शेवटी तो योग जुळवून आणला.

Brandenburger Tor च्या मागच्या बाजूला Strasse der 17 Juni (अगदी मराठीत भाषांतर करायचं तर '१७ जूनचा रस्ता') आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण Tiergarten म्हणजेच उद्यान पसरलं आहे. याच परिसरात राईश्टॅग आहे आणि या राईश्टॅगला लागूनच आहे 'नाझी राजवटीत मारल्या गेलेल्या सिंटी आणि रोमा वंशीयांचं स्मारक'!



आपल्याकडे असतात, तशा युरोपातही अनेक भटक्या जमाती आहेत. त्यापैकीच दोन म्हणजे सिंटी आणि रोमा! नाझी राजवटीत या सगळ्या भटक्या जमातींना एकच टॅग देण्यात आला. त्यांना सरसकट Gypsy घोषित करण्यात आलं. भटके असल्यामुळे अर्थातच नाझींच्या मते ते कमअस्सल होते. अशुद्ध रक्ताचे होते. त्यामुळे मग ज्यू वंशीयांप्रमाणे त्यांच्याही वाट्याला हालअपेष्टा, छळछावण्या आणि Final Solution म्हणजेच गॅस चेंबर किंवा तत्सम शिक्षा आल्या. या सिंटी आणि रोमा वंशाच्या लहान मुलांवर नाझी डॉक्टरांनी वेगवेगळे प्रयोग करून त्यांना मारलं. पुरुषांना आधी मजुरीची कामं करायला लावून मग ते निकामी झाल्यावर त्यांना ठार मारण्यात आलं. १९३३ पासून ते १९४५ च्या मे महिन्यापर्यंत हा वरवंटा फिरतच होता. या वरवंट्याखाली सिंटी आणि रोमा वंशाचे पाच लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले. जे जगले, ते कुपोषित होते.

या स्मारकाच्या परिसरात व्हायोलिनची गंभीर सुरावट सतत वाजत असते. स्मारकाबाहेर इंग्रजीत हा सगळा इतिहास लिहिला आहे. १९३३ पासून १९४५ पर्यंत कधी आणि कोणते निर्णय कोणी घेतले, त्याच वर्षागणिक नोंद आहे. हे सगळं वाचताना अंगावर काटा येतो. मन अस्वस्थ होतं. व्हायोलिनचे सूर त्या अस्वस्थतेला खेदाची किनार देतात.


 

या वातावरणात आपण आत जातो. आत तसं बघायला गेलं, तर काहीच नाही. फक्त एक गोलाकार तळं आहे. त्या तळ्याच्या मध्यभागी काळे ग्रॅनाईटचे दगड ठेवलेत आणि त्या दगडांवर दोन पांढरी फुलं... तळ्याभोवती वेगवेगळ्या आकाराचे दगड आहेत. त्यातले काही असेच आहेत, तर काहींवर छळछावण्यांची नावं कोरली आहेत. सिंटी आणि रोमा वंशाच्या लोकांना त्या त्या छळछावण्यांमध्ये मारलं होतं. या छावण्या जर्मनीत तर होत्याच, पण ऑस्ट्रिया, पोलंड आणि जर्मनव्याप्त रशियातही होत्या.

तळ्याच्या काठी पाण्यात काही गुलाब ठेवले होते. कदाचित सिंटी-रोमा वंशियांपैकी कोणी आपल्या आप्तेष्टांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठेवले असावेत. तळ्याभोवती हिरवळ आहे आणि त्या हिरवळीच्या चोहूबाजूंना उंचच उंच वृक्ष! मी आत गेलो. काही वेळ नि:स्तब्ध उभा होतो. तेवढ्यात एक जोडपं आलं. वयस्कर होते दोघंही. बहुधा त्या आजी सिंटी किंवा रोमा वंशाच्या असाव्या, कारण तळ्याजवळ गेल्यानंतर त्यांना राहावलं नाही आणि त्या रडायला लागल्या. आजोबांनी त्यांना सावरलं आणि दोघंही मूक उभे राहिले.



त्या दोघांशी बोलावं, असं खूप मनात आलं होतं. पण मला त्या शांततेचा भंग करायचा नव्हता. काहीही न बोलता मी तसाच काही वेळ उभा राहिलो. एका झाडामागून जर्मन राईश्टॅग दिसत होती आणि त्यावर जर्मनीचा झेंडा अभिमानाने फडकत होता. राहून राहून मला त्या राईश्टॅगच्या इमारतीवर कोरलेलं वाक्य आठवत होतं, 'Dem Deutschen Volke' म्हणजेच '(For) The German People'!

या देशाने खूप भोगलं आहे. यांच्या पूर्वजांनी याच देशात राहणाऱ्या काही लोकांवर अनन्वित अत्याचार केले. वंशश्रेष्ठत्वापायी लाखो लोकांना छळ करून मारलं. आता या लोकांना त्या सगळ्याची लाज वाटते. पण जे घडायला नको होतं, ते घडून गेलं. पण जेव्हा ते घडत होतं, तेव्हा बहुसंख्य जर्मन लोकांनी त्याचा विरोध का केला नाही? त्यांनाही हे सगळं मंजूर होतं का? हिटलरने असं कोणतं गारूड त्यांच्या मनावर घातलं होतं? हे सगळं त्यांना थांबवता आलं नसतं का? असे अनेक प्रश्न आपसुक मला पडतात. इतिहासातल्या त्या घटनांची चाहूल वर्तमानातही लागते आणि आणखीच धडधडतं...

वंश, धर्म, जात, वर्ण या गोष्टींचा अहंकार बाळगल्याने इतिहासात मानवजातीने खूप काही गमावलं आहे. नंतर अशी स्मारकं बांधून फार तर आपल्या पूर्वजांनी केलेल्या लांच्छनास्पद कृत्यांवर पांघरूण घालता येतं, पण त्याला फारसा अर्थ नसतो. या स्मारकांना भेट देऊनही हा धडा घेतला नाही, तर आपल्यासारखे कमनशिबी आपणच! जगाच्या पाठीवर हे असं स्मारक कुठेही उभं राहू नये, हीच इच्छा मी त्या स्मारकातून बाहेर पडताना मनोमन व्यक्त करत होतो.


Comments

Popular Posts