तेरी आवाज ही...


प्रिय दीदी,
खरं तर तुम्हाला दीदी न म्हणता थेट 'लता' असं एकेरी संबोधावं असंच वाटतं. त्याला कारण तुम्हीच! तुमच्या गाण्यांमधून तुम्ही जी काही जवळीक निर्माण केली आहेत की, 'काय गायल्या आहेत लतादीदी' किंवा 'लताबाई काय गायल्या आहेत', अशी दाद बाहेर पडतच नाही. दाद येते तीच 'स्स्स्स्स्... काय गायलीये यार लता...' अशी! लोकप्रिय कलाकाराच्या, खेळाडूच्या, अभिनेत्याच्या नशीबात ही चाहत्यांबरोबरची जवळीक आपसुकच येत असावी. म्हणूनच वयाने कितीही मोठे असले, तरी सुनील गावस्कर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, रफी, किशोर, सोनु निगम, राज कपूर, देव आनंद, ही मंडळी आमच्यासाठी 'तो-ती' असेच असतात. अगदी आशासुद्धा!

तुम्हाला पहिल्यांदा कधी ऐकलं, ते आठवत नाही. बहुधा आईच्या पोटात. कारण महाराष्ट्रच काय, देशातलं एकही घर, एकही टॅक्सी, बस, हॉटेल, पानाची गादी अशी नसेल जिथे दिवसातून किमान एकदा तरी तुमचं गाणं वाजलं नसेल. आणि हे अगदी तुम्ही गायला सुरुवात केलीत, तेव्हापासूनच चालत आलं आहे.

तर, तुम्हाला पहिल्यांदा कदाचित आईच्या पोटातच ऐकलं असावं. पण ठळक आठवण आहे ती, शाळेतल्या दिवसांची! शाळा सुरू होण्याचा मुहूर्त गाठून पाऊस हजेरी लावायचा. हो, तेव्हा तो वेळेत यायचा. त्यामुळे सकाळी डोळे चोळत उठल्यावरही घराबाहेर अंधारीच आलेली असायची. वडील कधीचेच उठलेले असायचे. चहाचं आधण शेगडीवर रटरटत असायचं. टेबलावर ठेवलेल्या छोट्याश्या रेडिओमधून पहाटे स्वर सांडायचे. मग भक्तिगीतांचा कार्यक्रम लागायचा. तोपर्यंत झोपही पापण्यांमधला मुक्काम सोडून दूर पळालेली असायची.  तेवढ्यात तुमची साद यायची, 'रंगा येई वो... ये, कान्हा येई वो... ये'!



खरं सांगतो, तुमची ती साद ऐकून हृदयात खरंच कालवाकालव सुरू व्हायची. 'विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई...' ज्ञानेश्वरांचे ते शब्द तुमच्या आवाजात ऐकले की, जीव अगदी कोंडून जायचा. अगदी लहानपणीच आवडलेलं तुमचं आणखी एक गाणं म्हणजे 'रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन'. किशोरच्या आवाजातल्या गाण्यापेक्षा मला नेहमी तुमचचं गाणं जास्त आवडत आलं आहे. त्यातही त्यातल्या 'लाS लाS लाS'च्या शेवटी तुम्ही घेतलेल्या हरकतीवरून तर कोणीही जीव ओवाळून टाकावा!

हरकतींचाच विषय आला म्हणून सहज तुमचं 'अनपढ'मधलं 'आपकी नजरों नें समझा' आठवलं. त्यात तर अरे अरे अरे... जवळपास प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दावर स्वरांची लडच लावली आहे. मदन मोहनचं संगीत आणि तुमचा आवाज, हे समीकरण तर अव्वलच! आणखी एक गाणं आठवलं. 'अमर प्रेम'मधलं 'रैना बिती जाए'! त्यात तर पाण्यावरून तरंग फिरावेत, तसा तुमचा आवाज फिरला आहे.

हे सगळे बारकावे खूप नंतर कळले पण! लहानपणीचं ते 'रंगा येई वो...' वगळलं तर माझ्या लेखी तुम्ही बाद होतात. म्हणजे तुमची गाणी कानांवर पडत होती, पण माझ्या कानांचे मधुकर आशाच्या जीवघेण्या आवाजाभोवती गुंजन करत होते. कॉलेजमध्ये आलो आणि आशाच्या 'मेरा कुछ सामान'ने पार संपवलं. लता आवडत नाही, म्हटल्यावर वडिलांनी तर मला त्यांचं नाव लावायचं नाही, एवढं सांगणंच बाकी ठेवलं होतं. बहुधा त्यांनी मला तुमची गाणी ऐकवण्याचा आणि त्यातली सौंदर्यस्थळं दाखवण्याचा चंगच बांधला होता. त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांना आवडते म्हणूनच 'Romantic Duets of Lata Mangeshkar' ही एक कॅसेट घेतली. कॅसेटमधल्या पहिल्या गाण्यानेच पार कोलमडून गेलो.

गाणं होतं, 'शोला जो भडके दिल मेरा धडके'! सी. रामचंद्र यांचं संगीत आणि तुमचा आवाज या योगाला दुग्धशर्करा योग म्हणणं म्हणजे आपल्या प्रतिभेची मर्यादा दाखवून देण्यासारखं आहे. बांगड्याची आमटी, आंबेमोहोर भात, सरंग्याचा तुकडा आणि नंतर तोंड रंगवणारा विडा असाच योग तो! पहिली दोन कडवी गेली आणि मग तुमची 'देखा जो तुमको' या ओळीआधीची तान कानावर पडली. 'स्टॉप'चं बटण दाबून 'रिवाइंड' केलं आणि तो चमत्कार पुन्हा पुन्हा ऐकला.



याच कॅसेटमध्ये 'ये रात भिगी भिगी' हे 'चोरी चोरी'मधलं गाणंही होतं. 'निळ्या डोळ्यांच्या राजकुमारा'नेच तुमच्याकडून गाऊन घेतलेलं. त्यात मन्ना डे 'उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा' गाऊन पुन्हा 'ये रात भिगी भिगी'वर येतात आणि मागून तुमचा आलाप सुरू होतो. अंगावर सर्रकन काटा आला होता. आणि पुढे जेव्हा जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा तेव्हा तो येतच राहिला.

'धीरे से आजा री' ही अंगाई तर देशाची अंगाई होईल, एवढी तुमच्या सुरांमध्ये आणि त्या चालीतही ताकद आहे. 'प्यार हुवा इकरार हुवा' हे ऐकत अनेक पिढ्यांनी प्रेम केलं. 'कहीं दीप जले कहीं दिल' ऐकलं की अजूनही घराबाहेरच्या झाडांमागे कोणी दडलं तर नाही ना, हे बघावंसं वाटतं. 'तेरे बिना आग ये चांदनी' ऐकलं की, खिळून जातो.

तुमचा आवाज काय आहे, त्याची ताकद कशात आहे, तुमच्या गाण्यातली मर्मस्थळं (मग ते 'रूलाके गया सपना मेरा'मधलं व्हायोलिन असो किंवा 'नक्ष फरियादी हैं' मधलं तुमच्या आवाजाशी एकरूप झालेलं स्वरमंडल असो) हळूहळू उलगडत गेली आणि मग अक्षरश: तुमच्या गाण्यांचा अभ्यासच करायला लागलो.

याच प्रवासात तुमच्याबद्दल इतरांनी लिहिलेल्या अनेक गोष्टी वाचण्याचाही सपाटा लागला होता. राजू भारतन यांनी लिहिलेलं तुमचं 'वादग्रस्त' चरित्रही वाचनात आलं. त्यातल्या एका मुद्द्यावर खूप बारकाईने विचार केला आणि तुमच्या गाण्याचा गाभा नाही म्हणता येणार, पण काहीतरी मोठा ठेवा हाताशी लागल्यासारखं झालं.

तुम्ही गायला सुरुवात केलीत, तो काळ १९४२चा! 'माझं बाळ' या मास्टर विनायकांच्या चित्रपटात तुम्ही आणि आशा दोघींनीही पहिलं गाणं गायलंत. त्याच सुमारास 'चले जाव' चळवळ सुरू झाली. भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हाच 'आपकी सेवा में' या चित्रपटासाठी तुम्ही तुमचं पहिलं सोलो गाणं 'पा लागू कर जोरी ओ श्याम, मोसें ना खेलो होरी' गायलात.

यथावकाश फाळणी झाली आणि तोपर्यंत लाहोर, कलकत्ता आणि मुंबई अशा तीन प्रमुख शहरांमध्ये विभागलेली चित्रपटसृष्टी मुंबईत एकवटली. फाळणीनंतर भारतात आलेले अनेक संगीतकार स्थिरावण्यासाठी मुंबईत आले आणि तुम्हाला अखिल भारतीय सुरांचा साज मिळाला. स्वातंत्र्याची पहाट फुटत होती, नूरजहाँसारखे अनेक कलाकार पाकिस्तानात गेले होते. मंटोही पाकिस्तानच्या वाटेवर होता आणि तुम्ही बॉम्बे टॉकीजसाठी गात होतात, 'आएगा आनेवाला'...


तुमच्या आवाजात न्हाऊन निघायला कुठून कुठून संगीतकार आले! राजस्थान, मद्रास, त्रिपुरा, कलकत्ता, पंजाब, लाहोर, महाराष्ट्र, काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा विविध भागांमधून खेमचंद्र प्रकाश, गुलाम हैदर, नौशाद, मदनमोहन, सी. रामचंद्र, सुधीर फडके, वसंत देसाई, अनिल बिस्वास, सलिल चौधरी, एस. डी. बर्मन, आदीनारायण राव, हुस्नलाल-भगतराम, शंकर-जयकिशन, सज्जाद हुसैन, एन. दत्ता, असा एकापेक्षा एक सरस संगीतकारांची किती नावं सांगावीत.

तेव्हापासून तुम्ही गात आहात. नाही, तुम्ही आम्हा भारतीयांच्या सुखदु:खात सहभागी झाल्या आहात. 'आएगा आनेवाला' असो, 'प्यार हुवा इकरार हुवा' असो, 'आज फिर जिनें की तमन्ना हैं' असो, 'रैना बिती जाए' असो, 'दीदी तेरा देवर दिवानाँ' असो, 'खाँमोशियाँ गुनगुनानें लगी' असो किंवा अगदी आत्ताआत्ता गायलेलं 'लुखाछुपी' असो... किती गाणी सांगावीत!

दीदी, तुम्ही आम्हाला खूप आनंद दिलात. अनेकांनी तुमच्या आवाजाची तुलना सरस्वतीच्या वीणेशी केली आहे. सहस्रकातून एकदा होईल, असा तुमचा आवाज आहे, असं सगळेच म्हणतात. ते मी सांगायचीही गरज नाही. माझ्यासाठी मात्र तुमचा आवाज मोक्षप्राप्तिचा जवळून जाणारा मार्ग आहे.

आजही रात्रीच्या वेळी 'खामोंश हैं जमाना...' सुरू होतं आणि हातातलं काम बाजूला राहतं. 'रैना बिती जाए' ऐकायला सुरुवात केली की, कसनुसं होतं, 'इच का दाना बिच का दाना' ऐकायला लागलं की, डोलावंसं वाटतं, 'मैं क्या करूं राम मुझे बुढ्ढा मिल गया'मधला तुमचा खट्याळ भाव ऐकून हसायला येतं.

हे फक्त चित्रपटांमधल्या गाण्यांचं झालं. तुमच्या आवाजातला गालिब काय किंवा ज्ञानेश्वर काय, ऐकायला लागलं की, सगळं तत्वज्ञान समोर उलगडतं. 'एहदे गम में भी मुस्कुराते हैं' असो किंवा 'दिन तैसे रजनी' असो आमचा खात्मा ठरलेलाच.



तुमचं गाणं म्हणजे चांदण्या रात्री यमुनेच्या पात्रातून घेतलेल्या ताजमहालाच्या दर्शनासारखं आहे. तो आपलासा वाटतो, त्याच्या जवळ जावंसं वाटतं, त्याला स्पर्श करावंसं वाटतं पण तरीही त्याची भव्यता दिपवून टाकते.

कधीकधी खूप अस्वस्थ वाटतं, मनाला मरगळ येते. स्वस्थ झोप येणार नाही हे कळलेलं असतं. अशा वेळी 'मालवून टाक दीप' लावतो. डोळे मिटून घेतो. सतार, हळूवार तबला आणि तुमचा अलवार आवाज आपली जादू सुरू करतात. ते विव्हल सूर ऐकूनही माझ्या मनाचा डोह शांत झालेला असतो.

तुम्ही नव्वदीत पदार्पण केलंत. त्यापैकी ७० वर्षांपेक्षा जास्त काळ तुम्ही गाताय. तुम्ही आम्हाला जे काही भरभरून दिलंय, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा खटाटोप!

तुमचा,
रोहन...

Comments

Popular Posts