दार उघड, माते... दार उघड!



सध्या नवरात्र सुरू आहे. नवरात्र म्हणजे आदीशक्तीचा, जगन्मातेचा जागर! पण या नवरात्रीच्या आसपासच इतक्या वेगवेगळ्या घटना कानांवर पडत आहेत की, निसर्गातल्या आदीम स्त्रीत्वाची एवढी कत्तल माणूस म्हणून आपण कशी काय करू शकतो, याचंच कोडं पडलं आहे.

आज म्हणजे ११ ऑक्टोबरला कानावर आलेली बातमी होती उत्तराखंडमधून आलेली. स्वच्छ गंगेसाठी आंदोलन करणाऱ्या जी. डी. अग्रवाल या पर्यावरणवादी अभियंत्याचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन झालं.

एवढ्या वयाचं म्हातारं माणूस मरायचंच. पण अग्रवाल गेले ते सलग १११ दिवसांच्या उपोषणानंतर! हे उपोषण त्यांनी का केलं होतं, तर आयुष्यभर त्यांनी ज्या गोष्टीचा ध्यास घेतला होता, ती गोष्ट 'याचि देही याचि डोळा' घडावी या साठी!

गोष्ट तशी सोपी आहे. ते आंदोलन करत होते गंगेवर बांधल्या जाणाऱ्या अनेक विद्युत प्रकल्पांविरोधात आणि स्वच्छ गंगेसाठी! बरं हा माणूस काही साधासुधा नव्हता.

आयआयटी रूरकी मधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं. त्यानंतर सत्तरीच्या दशकात त्यांनी बर्कले विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकी या विषयात डॉक्टरेट मिळवली. अशा प्रकारच्या विषयातही शिक्षण घेतलं जाऊ शकतं, हे त्या वेळी कोणाच्या गावीही नव्हतं. 



तर अग्रवाल म्हणजे काही साधीसुधी असामी नव्हती. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातही अडीच महिने उपोषण केलं होतं. त्या सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. पण या वेळी मात्र १०९ दिवस फक्त पाणी-मध यांच्यावर काढल्यानंतर सरकारशी सुरू असलेल्या चर्चा निष्फळ ठरल्या आणि शेवटचे दोन दिवस अग्रवाल यांनी अनोश्यापोटीच काढले. अखेर गुरुवारी ते गेले.

गमतीची गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतवर्षात नद्यांना माता म्हणतात. उत्तरेत तर गंगा-यमुना या नद्यांचा उल्लेख करतानाही लोकांच्या तोंडून सर्रास गंगा मैय्या, जमना मैय्या असंच बाहेर पडतं. 

पण ते फक्त बोलण्यापुरतं. 'माझी आई-माझी जननी' वगैरे फेसबुकी भाषा वापरून घरच्या म्हातारीच्या पेटाकात उठता-बसता लाथ घालण्याचाच प्रकार जास्त. रोज यमुना ओलांडताना ते काळं पाणी बघून, एके काळी ते पात्र किती विशाल होतं, याच्या गोष्टी ऐकून मन विषण्ण होतं.

याआधीच्या आणि आताच्या सरकारने गंगा शुद्धीकरणासाठी खास योजना आखल्या आहेत. त्यात किती पैसा 'गंगार्पणमस्तु' झाला, तो मुद्दा नाही. मुद्दा हा की, त्याचा काही उपयोग झाला का? प्रथमदर्शनी तरी तसं दिसत नाही.

भूपेन हजारिका यांचं एक सुंदर गाणं आहे. आज जी. डी. अग्रवाल यांच्या मृत्युची बातमी ऐकली आणि ते गाणं आठवलं. ते गाणं म्हणजे 'ओ गंगा तुम बहती हो क्यूँ...'


दुसरी बातमी होती ती यवतमाळच्या पांढरकवडा वनक्षेत्रातल्या 'अवनी' नावाच्या तथाकथित नरभक्षक वाघिणीची! या वाघिणीने म्हणे १३ जणांचा बळी घेतला आहे आणि तिला ठार मारायला आता जोरदार शोध सुरू आहे.



एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ज्या १३ जणांचा बळी या वाघिणीने घेतल्याचा दावा केला जात आहे, त्यापैकी फक्त चारच जणांचं शवविच्छेदन झालं. त्यातल्या तीन जणांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झालाच नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एकाचा मृत्यू वाघिणीमुळे झाला असला, तरी त्याचा मृतदेह घनदाट जंगलात सापडला होता. म्हणजेच वाघिणीने मनुष्यवस्तीत येऊन हल्ला केलेला नाही.

या वाघिणीचे छोटे बछडेही आहेत. ते एवढे लहान आहेत की, त्यांना त्यांच्या आईची गरज जास्त आहे. मुळात आपल्या संस्कृतीत साहचर्य हा खूप छान शब्द आहे. तो फक्त शब्द नाही, तर ती एक भावना आहे. पण आजकाल ती भावना आपण गमावत चाललो आहोत.

सुखाची गोष्ट एकच की, या वाघिणीला ठार मारू नये, यासाठीही काहींनी एकत्र येत मोहीम सुरू केली आहे. जंगलाचा एक कायदा असतो. कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याला विनाकारण मारत नाही. किंबहुना माणूस सोडला, तर इतर कोणताही प्राणी दुसऱ्याला मजा म्हणून अपाय करत नाही.



माणसाने केवळ आपल्या छंदासाठी या ग्रहावरून अनेक प्राण्यांच्या प्रजाती नष्ट केल्या आहेत. शिकारीसारखे मोठे थाट कशाला, माझ्या ओळखीत अनेक लोक असे आहेत की, जे रस्त्यावरून चालताना बाजूला मुकाट झोपलेल्या कुत्र्यालाही उगाचच लाथ मारून पुढे जातात. माणसाला शक्य झालं, तर कोंबड्या, डुकरं, बकरे, गायी-म्हशी, बदकं हे खाण्यालायक प्राणी वगळता तो या भूतलावरून सगळे प्राणी नष्ट करेल.



तिसरी बातमी होती अगदी दोन-तीन दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी दिलेल्या एका गंभीर इशाऱ्याची! इतर वेळी 'बघा कसं जमतंय' किंवा 'कदाचित असं होईल' अशा भाषेत बोलणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी या वेळी थेटच इशारा दिला आहे. ते म्हणतात की, 'मुर्खांनो, आता तरी शुद्धीवर या'!

या सगळ्या शास्त्रज्ञांचा रोख प्रदूषणामुळे होणारी तापमानवाढ, त्यातून पृथ्वीची होणारी अपरिमित हानी आणि त्यामुळे भेडसावणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे आहे.

हा धोका किती गंभीर आहे, तर वेळीच उपाययोजना केली नाही, तर लवकरच सातत्याने उष्णतेच्या लाटा येत राहतील, पृथ्वीचं तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढेल आणि तब्बल १० लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसेल.


पण या सगळ्यातून आपण काहीच शिकणार नाही. नद्यांना माता, आई, मैय्या म्हणत आपण त्यांची अवहेलना करणार. एका वाघिणीला तिच्याच राहत्या जंगलात घुसून ठार मारणार. 'मदर नेचर' म्हणजेच निसर्गाच्या नियमांचा मान न ठेवता आपल्याला हवं तसं वाकवणार, पृथ्वी, जिला आपण माताच म्हणतो, तिचीही हेळसांडच करणार.

हे सगळं बघून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला थोडं पुढे न्यावंसं वाटतं. डार्विनने माणूस उत्क्रांत होत जाईल, असं म्हटलं होतं. त्याने हा सिद्धांत मांडताना सपाट मांडणी केली होती.

पण प्रत्यक्षात ही मांडणी गोलाकार असावी. माणसाची उत्पत्ती जिथे सुरू झाली तिथून ही मांडणी सुरू होते आणि माणूस उत्क्रांतीच्या सर्वात वरच्या टप्प्यात असताना तो गोलाच्या वरच्या टोकाला असावा. तिथून पुन्हा त्याची घसरण सुरू होत तो उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर येऊन पोहोचत असणार. 

मी काही डार्विनएवढा मोठा नाही. पण चुकून हा कयास खरा ठरला, तर भीती ही आहे की, ती घसरण सुरू झाली असावी. तसंही स्मार्टफोन्सच्या निमित्ताने आपण सगळेच पुन्हा 'अंगठे बहाद्दर' झालो आहोतच. पुन्हा एकदा उलटा प्रवास सुरू झाला असेल, तर गुरुत्त्वाकर्षणाचा नियम इथे लागू होईल. माणसाला उत्क्रांत व्हायला जेवढा वेळ लागला, त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी कमी वेळात आपण पुन्हा शून्यावस्थेत जाऊन पोहोचू.



दु:खं याचंच आहे की, ज्या पृथ्वीच्या जडणघडणीत आपला काडीचाही वाटा नव्हता, त्या पृथ्वीच्या ऱ्हासाला मात्र आपणच जबाबदार असू.

हे सगळं बोलताना आणखी बातम्या रोज धडकत आहेतच. इंडोनेशिया, फ्लोरिडा, कॅरोलिना, जपान, ओडिशा या ठिकाणी येणारे पूर, भूकंप, त्यामुळे होत असलेला विध्वंस, अपरिमित हानी आणि हवालदील झालेली माणसं! 

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचा जागर करतात. त्या देवीला 'दार उघड, बये, दार उघड' अशी विनवणी करतात. खरं तर माणसाला आपल्या बुद्धीची दारं उघडण्याची गरज आहे. देवधर्म वगैरे मानण्याचा माझा पिंड नाही. पण जे मानतात, त्यांच्या प्रार्थनेला यश येवो आणि माणसाच्या डोळ्यांवरची झापडं आणि त्यांच्या बुद्धीची कवाडं या निमित्ताने खुली होवोत!

Comments

Popular Posts