'तमस' - एक धुमसता कालखंड!
टीप: हे काही पुस्तकाचं परीक्षण नाही. दिल्लीत येऊन सव्वा वर्ष होत आलं. कोणत्याही अनोळखी शहरात आल्यानंतर सर्वात आधी काही शिकावं, तर तिथली भाषा. भाषा शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्थानिकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करणं आणि त्या भाषेतल्या साहित्याची ओळख करून घेणं!
आपल्याला मराठी साहित्याची माहिती असते, मराठी साहित्यातले अनेक प्रकार, अनेक कलाकृती आपण वाचल्या असतात, त्यांचं रसग्रहण केलं असतं. पण मराठी वगळता इतर कोणत्याही भाषेतल्या साहित्याबद्दल बऱ्याचदा आपण अनभिज्ञ असतो. (सन्माननीयांनी स्वत:ला अपवाद समजून यातून वगळावं.)
याच विचारातून एक उपक्रमही डोक्यात आला. जमल्यास दर महिन्याला एक हिंदी पुस्तक, कवितासंग्रह वाचायचा आणि मराठीतून त्याची ओळख मराठी वाचकांना करून द्यायची. त्या निमित्ताने हा पहिला प्रयत्न...
-------------------------------------------------
-------------------------------------------------
स्थळ - दिल्लीतल्या क्राफ्ट्स म्युझिअमच्या बाहेरचा कॅफे लोटा.
"आले में रखे दीये ने फिर से झपकी ली। ऊपर, दीवार में, छत के पास से दो ईंटे निकली हुई थीं। जब-जब वहाँ से हवा का झोंका आता, दीये की बत्ती झपक जाती और कोठरी की दीवारों पर साए-से डोल उठते। थोडी देर बाद बत्ती अपने-आप सीधी हो जाती और उसमें से उठनेवाली धुएँ की लकीर आले को चाटती हुई फिर से ऊपर की ओर सीधे रुख जाने लगती। नत्थू की साँस धौंकनी की तरह चल रही थी और उसे लगा जैसे उसकी साँस के ही कारण दीये की बत्ती झपकने लगी है।"
युनिव्हर्सिटीत एम.ए. करत होतो, तेव्हापासूनची मैत्रिण सुधा एका पुस्तकाचं पहिलं पान वाचत होती. समोर टेबलावर एकापेक्षा एक सरस पदार्थ येऊन खोळंबले होते. पण त्या पहिल्या पानानेच मनाचा ठाव घेतला होता.
साधारण दीड पान वाचून झाल्यानंतर सुधाने वाचन थांबवलं. तोपर्यंत मी पूर्णपणे त्या पुस्तकाच्या कह्यात गेलो होतो. पुस्तकाचं नाव होतं 'तमस'! त्या वेळी ते पुस्तक कोणी लिहिलं आहे, एवढीच जुजबी चौकशी केली. ते कशाबद्दल आहे, पुढे काय होतं, वगैरे काहीच प्रश्न विचारायचं सुचलं नाही आणि विषय बदलला गेला.
पुढे अनेक महिन्यांनी दिल्लीतल्या कनॉट प्लेस भागातल्या अम्रित बुक डेपोमध्ये गेलो असता पुस्तकांच्याच एका शिडाळ्यावर भीष्म सहानी यांचं हे पुस्तक सापडलं. कोणताही विचार न करता ते विकत घेतलं आणि त्याच रात्री वाचायला सुरुवात केली.
'तमस' ही एका धुमसत्या कालखंडाची गोष्ट आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक भीष्म सहानी यांचं मनोगत अगदी थोडक्यात लिहिलं आहे. पाकिस्तानमधल्या रावळपिंडीमध्ये १९१५मध्ये जन्मलेले सहानी फाळणीनंतर भारतात आले. सुरुवातीला पत्रकारिता करता करता त्यांनी इप्टा या नाटक कंपनीतही मुशाफिरी केली. नंतर ते शिक्षकी पेशात शिरले.
पत्रकारितेच्या काळातच बहुधा त्यांनी मुंबईजवळच्या भिवंडीत झालेले दंगे कव्हर केले. त्या दंग्यांच्या दृश्यांनी त्यांच्या मनावर झालेल्या जखमांवरच्या खपल्या निघाल्या आणि १९४६-४७च्या आसपासची जखम भळाभळा वाहू लागली. त्यातूनच जन्माला आली 'तमस' ही कादंबरी.
माझ्या मते, 'तमस' सार्वकालीक आहे. त्याची काही कारणंही माझ्या अल्पमतीला जेवढी झेपली, तेवढी सांगतो.
कादंबरी सुरू होते ती वर उद्धृत केलेल्या प्रसंगातून. एका कोठीत (झोपडीत किंवा छोट्या खोलीत) नत्थू एका डुकराला मारायचा प्रयत्न करतोय. हे काम रात्रीच्या अंधारातच झालं पाहिजे, असा नत्थूला आदेश असतो. त्यामुळे नत्थू रात्रीच्या अंधारात एका मिणमिणत्या दिव्याच्या साक्षीने डुकराची शिकार करायच्या प्रयत्नात असतो.
ही कादंबरी या पहिल्या प्रसंगापासूनच पकड घेते. ती कोठी, त्यातला अंधार, एका कोनाड्यातला मिणमिणता दिवा, त्या दिव्याची फडफडणारी ज्योत, काजळी, कोठीत पडलेला कचरा, सुळे रोखून तडफडणारं डुक्कर, घामाने डबडबलेला नत्थू असं सगळं डोळ्यासमोर यायला लागतं. हे काय चाललं आहे, ते काहीच कळत नाही. नत्थू डुकराला मारणार की, ते डुक्कर नत्थूला घायाळ करणार अशी उत्कंठा लागून राहते.
पुढे मग कादंबरीतली इतर पात्रं एक-एक करून येतात. त्यात मग काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, केवळ मिरवण्यासाठी खादी घालून नेतेगिरी करणारे आहेत, मुस्लिम लीगचे लोक आहेत, हिंदु महासभेचे लाठ्या-काठ्या चालवण्याचे वर्ग घेणारे सळसळत्या रक्ताचे तरुण आहेत आणि आहेत ती आपल्यासारखी हाडामांसाची सामान्य माणसं.
ही कादंबरी सार्वकालीक असण्याचं मुख्य कारण म्हणजे भीष्म सहानी यांनी या कादंबरीत जे काही रेखाटलं आहे, ते त्या काळाचं चित्र आहे. फाळणीआधीपासूनच दोन्ही बाजूंच्या गावांमध्ये असंतोष धुमसत होता. दंगली पेटत होत्या. स्वातंत्र्य मिळालं, फाळणी झाली आणि त्याचा उद्रेक झाला.
या उद्रेकात सामावलेल्या असंख्य गोष्टींचं प्रातिनिधिक, तरीही सर्वसमावेश वर्णन या कादंबरीतल्या अनेक छोट्या छोट्या प्रसंगात केलं आहे. या गावात घडलेले प्रसंग कमीअधिक तीव्रतेने संपूर्ण वायव्य प्रांतात घडले होते. एका अर्थाने ही त्या वेळच्या त्या ठिकाणच्या सगळ्याच गावांची कादंबरी आहे.
कादंबरीच्या सुरुवातीच्याच प्रसंगातलं ते डुक्कर भेटतं ते थेट गावातल्या मुख्य मशिदीच्या पायरीवर तेदेखील मृतप्राय अवस्थेत! दंगे भडकतात आणि कादंबरी पुढे सरकते.
भीष्म सहानी यांनी मानवी स्वभावातल्या असंख्य कंगोऱ्यांचं चित्रण या कादंबरीत केलं आहे. या व्यक्तींच्या स्वभावातला विरोधाभास, आत्यंतिक द्वेषाची भावना, त्याच वेळी आत्यंतिक प्रेमाचा वर्षाव असं सगळंच रेखाटलं आहे.
आखाड्यात मास्टर देवव्रत यांच्याकडून दीक्षा घ्यायला जाणारा रणवीर नावाचा १४-१५ वर्षांचा मुलगा आपल्याला भेटतो. दीक्षा देण्याआधी मास्टर त्याला कोंबडा कापायला लावतात. त्याचे हात थरथरतात. पण तरीही तो कोंबड्याची मान कापतो. कोंबडं मरत नाही, पण मास्टर त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारतात.
पुढे हाच १४-१५ वर्षांचा रणवीर मोहल्ल्यातल्या छोट्या पोरांचा नेता बनतो. शहरात दंगे भडकले असतात. धुमसणाऱ्या वातावरणात एका तरी मुसलमानाचा खुन करायचा असा निश्चय करून ही पोरं गल्लीतल्या एका घरात दबा धरून बसतात. तशातच अत्तरं-तेलं विकणारा एक मुसलमान म्हातारा गल्लीत शिरतो. अत्तराच्या बाटल्यांच्या भारानेही कंबरेत वाकलेल्या या म्हाताऱ्याला मारायला १४ वर्षांचं एक पोरटं खिशात चाकू घेऊन त्याच्या मागे लागतं.
या पोराची चाहुल लागल्यावर म्हातारा थांबतो. घाबरलेल्या, घामाने डबडबलेल्या त्या मुलाला पाहून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. 'शहरात दंगे भडकले असताना एकटाच कुठे रे बाबा बाहेर पडलास', असं विचारून पुढल्या मोहल्ल्यापर्यंत सुखरूप नेतो असंही सांगतो आणि चालायला लागतो. इथे द्विधा मनस्थितीत सापडलेला तो मुलगा मनाचा हिय्या करून खिशातून चाकू काढतो आणि म्हाताऱ्याच्या कंबरेत खुपसतो.
टळटळीत दुपारी तापलेल्या रस्त्यावर आग ओकणाऱ्या सुर्याकडे तोंड करून म्हातारा जखमी अवस्थेत पडतो. तो ओरडतो, "ओ लोको, मार डाला! मुझे मार डाला". त्या पुढे सहानी लिहितात की, त्या कंबरेच्या जखमेमुळे त्या म्हाताऱ्याला तेवढ्या यातना होत नव्हत्या जेवढ्या एका निरागस मुलाने केलेल्या हल्ल्यामुळे होत होत्या.
आणखी एक गोष्ट येते ती शहानवाझ आणि रघुनाथ या दोस्तांची! दोघंही शहरातले बडे आसामी. एक मुस्लीम तर दुसरा हिंदू. रघुनाथचं घर मुस्लिमबहुल भागात असल्याने तो ते घर बंद करून घरात एका नोकराला पहाऱ्यासाठी ठेवून शहराच्या दुसऱ्या भागात आला आहे.
शहानवाझ या आपल्या दोस्ताला भेटायला येतो. रघुनाथची बायको त्याला त्यांच्या घरात ठेवलेल्या दागिन्यांची पेटी आणून द्यायची विनंती करते. वहिनींच्या विनंतीला मान देत शहानवाझ रघुनाथच्या घरी जातो. ती दागिन्यांची पेटी घेतो. पण परतताना रघुनाथच्या नोकराच्या पेकाटात अशी काही लाथ हाणतो की, नोकर गतप्राण होतो.
संध्याकाळी ती पेटी आपल्या मित्राच्या बायकोच्या हाती सोपवताना शहानवाझ नोकर कसा शिडीवरून गडगडत पडला, ही कहाणी सांगतो. आपल्या मनातला हिंदुंबद्दलचा क्षोभ तो या नोकरावर काढतो, हे चित्रण अंगावर काटा आणतं.
अशा अनेक गोष्टी एकमेकींमध्ये गुंफल्या आहेत. गावातलं एकमेव शिख कुटुंब. घरात फक्त म्हातारा-म्हातारी! गावातल्या मुखियापासून सगळ्यांशी अगदी नीट संबंध! पण दंग्यांच्या या काळात बाहेरची माणसं गावात येऊन वातावरण कशी बिघडवतात, हेदेखील यात येतं.
पुढे या शिख कुटुंबाला घरदार सोडून परागंदा व्हावं लागतं. दुसऱ्या गावात अनोळखी घराचा दरवाजा ठोठावून आश्रय मागायची वेळ येते. योगायोगाने ते घर मुसलमानाचं असतं. पण त्या घरातली बाई त्या दोघांनाही आश्रय देते. योगायोगाची साखळी इथे तुटत नाही. त्या घरातले कर्ते सवरते पुरूष या शिख जोडप्याचं घर लूटून त्यांची दागिन्यांनी भरलेली पेटी घेऊन घरी येतात. नवरा त्या शिख माणसाच्या रोजच्या व्यवहारातलाच असतो. हताश होऊन नवरा आणि त्याचा भडक माथ्याचा मुलगा या शिख जोडप्याला जाऊ देतात.
दुसऱ्या गावातला गुरूद्वारा आणि त्या गुरूद्वाऱ्यात केलेली लढाईची तयारी! शिख-मुस्लीम या दोन समाजांमध्ये निर्माण झालेली तेढ हिंसेला आमंत्रण देते. गावाचं नुकसान होतं, शिख महिला गावातल्या विहिरीत जोहार करतात. गावावर स्मशानकळा पसरते.
आणि एक कथा आहे ती एका शिख तरुणाचीही! जिवाच्या आकांताने पळणाऱ्या या तरुणाला काही मुस्लिम तरुण गाठतात. त्याला दगडांनी ठेचून मारायला सुरुवात करतात. तेवढ्यात त्या टोळीतल्या एकाला सुचतं आणि तो त्या शिख तरुणाला धर्म बदलण्याची 'ऑफर' देतो. तो शिख जीव वाचवण्यासाठी म्हणून ती स्वीकारतो आणि नंतर वाजतगाजत त्यांचं धर्मांतर केलं जातं.
एका ब्राह्मण मुलीची कथाही याच ओघात येते. दंग्याच्या काळात त्यांचं घर मुस्लिम लोक लुटतात. त्यातलाच एक तरुण या मुलीला पळवून आपल्या घरात डांबून ठेवतो. त्याला ती आवडत असते. तो तिला चांगलचुंगलं खायला घालतो, तिच्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त करतो. अखेर काहीश्या सक्तीने तर काही स्वेच्छेने ती मुलगी त्याच्याबरोबर नांदायला तयार होते.
अशा अनेक गोष्टी एकमेकींमध्ये गुंफून 'तमस' तयार होते. यात इंग्रज जिल्हाधिकाऱ्याचीही गोष्ट येते. इंग्रजांनी 'धर्मात ढवळाढवळ' या नावाखाली दंगे कसे थांबवले नाहीत, याचं चित्रणही या कादंबरीत केलं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे, शहरातल्या एकाही प्रतिष्ठिताला या दंगलींची झळ पोहोचत नाही. काँग्रेसचे, मुस्लिम लीगचे, शिखांचे, हिंदु महासभेचे आणि कम्युनिस्ट पक्षाचेही पुढारी दंगे थांबल्यानंतर त्या शांततेचं श्रेय घेण्यासाठीही कसे एकमेकांशी लढतात, हे दिसतं.
फाळणीच्या आधी, फाळणीदरम्यान प्रत्येक गावात हेच चित्र असेलच असं नाही. पण बहुतांश गावांमध्ये नेमकं काय घडलं असेल, हे तरी या कादंबरीच्या निमित्ताने कळतं.
एक गोष्ट मान्य करायला हवी की, भीष्म सहानी यांनी ही कादंबरी एका 'हिंदू'च्या किंवा 'शिखा'च्या चष्म्यातून लिहिली आहे. हे थेट जाणवत नसलं, तरी अनेक छोट्या छोट्या प्रसंगांमधून जाणवत राहतं.
नत्थूला डुक्कर मारायला सांगणारा मुरादअली मुसलमान असतो. तेच डुक्कर मशिदीच्या बाहेर मिळतं आणि शहरात दंगे भडकतात, ही गोष्टही याच निरीक्षणाला पुष्टी देणारी आहे.
या कादंबरीतली पात्रं खूप खरी आहेत. ती जगतात ते आयुष्य खरं आहे. त्याची झळ आपण प्रत्यक्ष सहन केली नसली, तरी ती आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. हेच या कादंबरीचं सगळ्यात मोठं यश आहे, असं म्हणावं लागेल.
दक्षिणेकडच्या राज्यांपेक्षा उत्तरेकडे जाती-धर्म यांच्यातला भेदभाव खूप जास्त आहे, हे दिल्लीत पाऊल ठेवल्यापासून प्रकर्षाने जाणवत होतं. हे असं का, याचं उत्तर काही अंशी ही कादंबरी देते.
(तळटीप: या कादंबरीवर आधारित चित्रपट गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केला आहे. आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिला असेल. पण कादंबरीही जरूर वाचावी, अशीच आहे.)
Comments
Post a Comment